मी राजकीय व्यक्ती नसल्याने कोणतीही राजकीय टिप्पणी करणार नाही - नरेश अरोरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 09:40 IST2026-01-14T09:39:12+5:302026-01-14T09:40:43+5:30
राष्ट्रवादी (अजित पवार)चे काम कसे चालते, अशी विचारणा करून काही कागदपत्रे मागितली; पण आमच्या इथून काहीही घेऊन गेले नाहीत

मी राजकीय व्यक्ती नसल्याने कोणतीही राजकीय टिप्पणी करणार नाही - नरेश अरोरा
पुणे : गेल्या दहा वर्षांपासून राजकीय प्रचारासंबंधी काम करत आहे. आम्ही निवडणुकीत ज्या पक्षाच्या प्रचाराशी जोडले जातो. तिथे नकारात्मक प्रचार कधीच करत नाही. अशा घटना घडत राहतात. मी राजकीय व्यक्ती नसल्याने कोणतीही राजकीय टिप्पणी करणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी स्पष्ट केले.
नरेश अरोरा यांच्या मुंढवा खराडी रस्त्यावरील एका इमारतीत डिझाईन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयावर गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर अरोरा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, गुन्हे शाखेने कामाची चौकशी केली. कार्यालयात काय काम चालते, याची माहिती घेतली. राष्ट्रवादी (अजित पवार)चे काम कसे चालते, अशी विचारणा करून काही कागदपत्रे मागितली; पण आमच्या इथून काहीही घेऊन गेले नाहीत. आमचे राजकीय काम आहे. त्यामुळे असं होत राहते. पोलिस अधिकारी संतुष्ट झाल्यानेच ते निघून गेले. आम्ही पैसे वाटत असतो तर या ठिकाणी काही सापडले असते. मात्र, काही सापडले नसल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील एका ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याची पडताळणी करण्यासाठी एक अधिकारी आणि दोन पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी किंवा तिथे काम करणाऱ्या लोकांमध्ये काहीही अनुचित आढळले नाही. त्यानंतर पथक ताबडतोब निघून गेले. काहीही अनुचित आढळले नाही. - पुणे पोलिस