वसंत मोरेंच्या 'हातोड्या'बाबत खा. कोल्हेंना विश्वास; 'राशप'मधील प्रवेशाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 09:33 PM2024-03-25T21:33:59+5:302024-03-25T21:58:09+5:30

महाविकास आघाडीतील पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर, आता वसंत मोरे काय भूमिका घेतील, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले होते.

Eat the public court of Vasant More. The gift of foxes; Indications of admission to ncp sharad pawar | वसंत मोरेंच्या 'हातोड्या'बाबत खा. कोल्हेंना विश्वास; 'राशप'मधील प्रवेशाचे संकेत

वसंत मोरेंच्या 'हातोड्या'बाबत खा. कोल्हेंना विश्वास; 'राशप'मधील प्रवेशाचे संकेत

मुंबई/पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडल्यानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यासाठी, महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नही सुरू होते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची त्यांनी भेट घेऊन चर्चाही केली होती. मात्र, काँग्रेसकडून पुण्यातील उमेदवारी जाहीर झाली असून आमदार रविंद्र धंगेकरांना महाविकास आघाडीने पुणे लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, वसंत मोरेंची नेमकी भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, खासदार अमोल कोल्हे यांनी आज वसंत मोरेंची भेट घेऊन विश्वास व्यक्त करत वेगळेच संकेत दिले आहेत. 

महाविकास आघाडीतील पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर, आता वसंत मोरे काय भूमिका घेतील, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले होते. मी एकला चलो रे च्या भूमिकेत असून त्यावर ठाम आहे. त्यामुळे, पुण्यातील निवडणुक मी एकतर्फी होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी आपल्या अपक्ष उमेदवारीचा पुर्नउच्चार केला होता. मात्र, आज खासदार अमोल कोल्हे यांनी वसंत मोरेंची भेट घेऊन त्यांच्या हातोड्याचा उल्लेख करत विश्वास व्यक्त केला आहे. 


''जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आमचे मित्र तथा माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या जनता दरबारास सदिच्छा भेट दिली. वसंततात्या मोरे हे धडाडीचे नेते तथा नेहमी सत्याच्या, न्यायाच्या बाजूने उभे राहणारे कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित आहे. वसंततात्यांचा "हातोडा" यावेळी न्यायाच्या बाजूने उभा राहणार हा विश्वास आहे,'' असे अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे. अमोल कोल्हेंच्या या विधानामुळे वसंत मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होतील, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. कारण, यापर्वी आमदार निलेश लंकेंबाबत खा. कोल्हेंनी असेच संकेत दिले होते. त्यानंतर, लंकेंनी शऱद पवारांची भेट घेऊन, मी त्यांच्याच विचारांचा माणूस असल्याचे स्पष्ट केले. तर, अहमदनगर मतदारसंघातून त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीही देण्यात येणार असल्याचे समजते. 

दरम्यान, वसंत मोरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मदत होऊ शकते. तर, आगामी विधानसभा निवडणुकांवेळी वसंत मोरेंना संधी दिली जाऊ शकते. मात्र, तुर्तात वसंत मोरेंनी आपली भूमिका जाहीर केली नसून पुणेकरांवर निर्णय सोपवला आहे.

Web Title: Eat the public court of Vasant More. The gift of foxes; Indications of admission to ncp sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.