खडकवासला धरणातून १६ हजार २४७ क्युसेकने विसर्ग;नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 17:44 IST2020-08-21T17:34:50+5:302020-08-21T17:44:09+5:30
नदीपात्राशेजारी वास्तव्याला असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

खडकवासला धरणातून १६ हजार २४७ क्युसेकने विसर्ग;नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
पुणे : पुणे शहरात पावसाने आज दिवसभर विश्रांती घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात त्याचा जोर कायम आहे.यामुळे पुणे जिल्ह्यातील धरण प्रकल्पातील खडकवासलासह अन्य धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ कायम राहिली आहे.खडकवासला,पानशेत धरण १०० टक्के तर वरसगाव धरण ९४ टक्के भरले आहे. तसेच पानशेतधरणातून शुक्रवारी (दि. २१) दुपारी खडकवासला धरणात ७३७६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरणातल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. वाढलेली पाणीपातळी लक्षात घेता पाटबंधारे विभागाकडून मुठा नदीत जवळपास १६,२४७ क्युसेकने पाणी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
शहरातील मुठा नदीत १६ हजार क्युसेकने विसर्ग सुरु असल्याने शहरातील बाबा भिडे पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. नदीपात्रातले सर्व रस्ते बंद करण्यात आले असून वाहतुकीला सक्त मनाई केली आहे. तसेच प्रशासन यंत्रणेकडून नदीपात्राशेजारी वास्तव्याला असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रात कुणीही वाहने पार्क करू नये व या मार्गावरून प्रवास करणे टाळावे असे आवाहन सुद्धा केले आहे.