PMC Election 2026: गुन्हेगारांच्या हातात घड्याळ! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची आंदेकर कुटुंबातील २ जणांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:19 IST2025-12-31T13:18:23+5:302025-12-31T13:19:29+5:30
PMC Election 2026 आता गुंडांना राजकीय पक्ष मोठा करणार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करणार, अशीच चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे

PMC Election 2026: गुन्हेगारांच्या हातात घड्याळ! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची आंदेकर कुटुंबातील २ जणांना उमेदवारी
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात तीन महिला उमेदवारांना राष्ट्रवादी (अजित पवार)ने उमेदवारी दिली आहे. त्यातील दोघी तुरुंगातून निवडणूक लढविणार आहेत. त्यात नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांच्यासह कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांचा समावेश आहे. या तीनही महिला उमेदवारांनी राष्ट्रवादी (अजित पवार)च्या अधिकृत 'एबी' फाॅर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) बरोबर आरपीआय सचिन खरात गटाची आघाडी झाली आहे. आरपीआय सचिन खरात गटाला चार जागा देण्यात आल्या आहेत. या चारही जागा घड्याळ चिन्हावर लढविल्या जात आहेत. प्रभाग क्रमांक २३ मध्ये आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी आरपीआय सचिन खरात गटातून देण्यात आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) कडून जयश्री मारणे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. गजा मारणे सध्या तुरुंगात असून त्याची पत्नी थेट महापालिका निवडणूक लढवत आहे. आता गुंडांना राजकीय पक्ष मोठा करणार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करणार, अशीच चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे.