सलग चौथ्यांदा भाजप की राष्ट्रवादीची मुसंडी? खडकवासल्याच्या तिरंगी लढतीत 'मन' से मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 19:11 IST2024-10-30T19:10:11+5:302024-10-30T19:11:17+5:30
सलग चौथ्यांदा भाजपला विधानसभेत पाठवणार, की दुसराच पक्ष मुसंडी मारणार, मनसेच्या एन्ट्रीने मतांची गणितं बदलणार

सलग चौथ्यांदा भाजप की राष्ट्रवादीची मुसंडी? खडकवासल्याच्या तिरंगी लढतीत 'मन' से मतदान
पुणे : पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदार संघातून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळेंना मनसेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार भीमराव तापकीर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दोडके शरद पवार गटाकडून लढणार आहेत. या तिरंगी लढतीत भाजप चाैकार मारणार की विकेट जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
खडकवासला मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके, महायुतीकडून भाजपचे भीमराव तापकीर, तर मनसेने मयुरेश वांजळे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी महापौर दत्ता धनकवडे उमेदवारी अर्ज दाखल करणार होते; पण पक्षाने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे धनकवडे यांनी अर्ज भरला नाही. त्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. येथे २००९ मध्ये मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे निवडून आले. त्यांच्या अकाली निधनानंतर २०११ मध्ये भाजपचे भीमराव तापकीर आमदार झाले. त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये तापकीर यांनी निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक साधली असून, २०२४ मध्ये विजयाचा चौकार मारण्यासाठी ते सज्ज आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ सलग चौथ्यांदा त्यांना विधानसभेत पाठवणार, की दुसराच पक्ष मुसंडी मारणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
निवडणूक तिरंगी होणार
२०१९ च्या निवडणुकीत अवघ्या २ हजार मतांनी तापकीर निवडून आले होते. दोडके यांनी चुरशीची लढत देत अखेरपर्यंत भाजपचा श्वास रोखून धरला होता. आता खडकवासला मतदार संघातून तापकीर यांना उमेदवारी देण्यावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच विरोध दर्शवला होता. परंतु जुन्या लोकांना संधी देत भाजपकडून तापकीर यांना उमेदवारी देण्यात आली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोडके यांना निवडून येण्याची संधी दिसून येत होती. अशातच मयुरेश वांजळे यांची उमेदवारी मनसेकडून जाहीर करण्यात आली. रमेश वांजळे यांचा मोठा चाहता वर्ग खडकवासल्यात आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.