सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 18:29 IST2024-04-16T18:28:01+5:302024-04-16T18:29:54+5:30
पूर्वी तालुक्यातून एकच सभा घेत होते. मात्र, आता पळावे लागत असल्याचा टोला अजित पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला...

सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या- अजित पवार
सुपे (पुणे) : तेलंगणात नद्यांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी १ लाख अश्वशक्तीच्या पंपाद्वारे उचलून परिसरातील तलाव भरण्यात येतात. त्याचप्रमाणे येथील नद्याद्वारे ओव्हरफ्लो होणारे पाणी बारामती, पुरंदर, इंदापूर आणि दौंड या जिरायती भागातील ओढे व परिसरातील तलावाकडे सोडणार असून, त्यासाठी लागणारी वीज ही सोलरवर तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात शेतीच्या पाण्याची समस्या मिटण्यास मदत होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
शरद पवारांना टोला-
पवार पुढे म्हणाले की विरोधक सध्या गावोगावी जाऊन सभा घेत आहेत. कुठे जेवण, कुठे नाष्टा तर कुठे चहा घेण्यासाठी थांबत आहेत. पूर्वी तालुक्यातून एकच सभा घेत होते. मात्र, आता पळावे लागत असल्याचा टोला अजित पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला.
आता चार दिवस सुनेचे सुरू झाले आहेत...
पवार म्हणाले, तुम्ही मला ३०-३५ वर्षे प्रेम दिले आहे. मीदेखील विकासकामांना महत्त्व देत आहे. यापुढेदेखील असेच प्रेम दाखवाल, याची मला खात्री आहे. त्यामुळे माझीही जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे सासूचे चार दिवस संपलेत. आता चार दिवस सुनेचे सुरू झाले आहेत, असेही पवार यांनी यावेळी बोलून दाखवले.
सुपे येथील पूजा गार्डन मंगल कार्यालयात महायुतीचा संवाद मेळावा झाला. याप्रसंगी पवार बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी सभापती दिलीप खैरे, कालवा सल्लागार समिती सदस्य पोपट खैरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, तालुका दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, सरपंच तुषार हिरवे, भरत खैरे, शौकत कोतवाल, ज्ञानेश्वर कौले, बी. के. हिरवे, सुशांत जगताप, आप्पासो शेळके, माजी सभापती संजय भोसले, शारदा खराडे, अविनाश गोफणे, संजय दरेकर, बापूराव चांदगुडे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शिवसंग्राम पक्षाच्यावतीने महायुतीच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा देण्यात आला.