बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी १५ ईव्हीएम, ५ कंट्रोल युनिट आणि २३ व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 10:45 AM2024-05-08T10:45:53+5:302024-05-08T10:46:32+5:30

बंद पडलेल्या कंट्रोल युनिट मतमोजणीच्या वेळी सोबत ठेवले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सांगितले....

15 EVMs, 5 Control Units and 23 VVPATs malfunctioned during polling in Baramati Lok Sabha Constituency. | बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी १५ ईव्हीएम, ५ कंट्रोल युनिट आणि २३ व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी १५ ईव्हीएम, ५ कंट्रोल युनिट आणि २३ व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू असताना १५ ईव्हीएम यंत्रे बंद पडल्याचे प्रकार घडले. तसेच ५ कंट्रोल युनिट आणि २३ व्हीव्हीपॅट यंत्रेदेखील बंद पडल्याची नोंद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. बंद पडलेल्या कंट्रोल युनिट मतमोजणीच्या वेळी सोबत ठेवले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सांगितले.

ईव्हीएम कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट ही इलेक्ट्रॉनिक यंत्रे उष्णतेला संवेदनशील असल्याने राज्यात यापूर्वी झालेल्या दोन टप्प्यांमध्ये अनेक ठिकाणी बंद पडण्याचे प्रकार घडले होते. बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. ७)देखील १५ ईव्हीएम, ५ कंट्रोल युनिट तर २३ व्हीव्हीपॅट बंद पडण्याचे प्रकार घडले. त्यात सर्वाधिक ९ ईव्हीएम भोर विधानसभा मतदारसंघात बंद पडले. तर बारामती व दौंड विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ३ ईव्हीएम बंद पडले. भोर विधानसभा मतदारसंघातच ३ कंट्रोल युनिट बंद पडले. तर बारामती आणि दौंड विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १ कंट्रोल बंद पडले होते. व्हीव्हीपॅट बंद पडण्याचे ८ प्रकार भोर मतदारसंघात घडले आहेत. तर पुरंदरमध्ये ६, बारामतीमध्ये ३, इंदापूरमध्ये १, दौंडमध्ये ३ व खडकवासला मतदारसंघात २ व्हीव्हीपॅट बंद पडण्याचे प्रकार घडले.

या मतदारसंघात मतदान सुरू होण्यापूर्वी मॉकपोल (मतदान प्रात्यक्षिक) करण्यात आले. त्यावेळीदेखील ४९ ईव्हीएम, १८ कंट्रोल युनिट व ३१ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडली होती. मतदान सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया केली जात असल्याने ही बंद पडलेली सर्व यंत्रे बदलण्यात आली.

द्विवेदी म्हणाल्या, ‘‘ईव्हीएम बंद पडल्यास नवीन ईव्हीएम जोडले जाते. त्यानंतर मॉकपोल घेण्यात येते. प्रत्येक उमेदवारास एक मत टाकून ते ईव्हीएम पुन्हा मतदानासाठी वापरले जाते. मात्र, ईव्हीएम बंद पडल्यास कंट्रोल युनिटदेखील बदलले जाते. केवळ कंट्रोल युनिट बंद पडल्यास नवीन कंट्रोल युनिट जोडले जाते. मतमोजणी वेळी जुने व नवीन कंट्रोल युनिट सोबत ठेवून दोन्ही युनिटमधील मतांची मोजणी केली जाते. व्हीव्हीपॅट बंद पडल्यास नवीन व्हीव्हीपॅट लावले जाते. मात्र, प्रत्यक्ष मोजणीच्या वेळी प्रतिनिधिक स्वरूपात केवळ पाच मशीन सोबत ठेवले जातात. मतमोजणीवेळी कंट्रोल युनिट बंद पडल्यास व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची बेरीज करून मतमोजणी केली जाते.”

Web Title: 15 EVMs, 5 Control Units and 23 VVPATs malfunctioned during polling in Baramati Lok Sabha Constituency.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.