lok sabha election mns chief raj thackeray slams cm devendra fadnavis over water problem farmer suicide | देवेंद्र फडणवीस बसवलेला मुख्यमंत्री; राज ठाकरेंचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस बसवलेला मुख्यमंत्री; राज ठाकरेंचा हल्लाबोल

नांदेड: देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. मुख्यमंत्री पाणी प्रश्नावर काहीच करत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पण तरीही राज्यातलं पाणी गुजरातला वळवायचं काम सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोंडातून चकार शब्द काढत नाही. कारण बसवलेला मुख्यमंत्री काय बोलणार?, अशा शब्दांमध्ये राज यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. 

राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. पाण्यावरुन वाद सुरू आहेत. मात्र अशा परिस्थितीत महाराष्ट्रातलं पाणी गुजरातला पळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण याविरोधात बोलण्याची महाराष्ट्र सरकारची हिंमत नाही. कारण बसवलेला मुख्यमंत्री काहीही करु शकत नाही, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. राज्यातलं पाणी गुजरातला नेलं जातं आहे. मराठवाडा, नाशिकचं पाणी गुजरातकडे वळवण्याचं काम सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस तोंडातून चकार शब्द काढत नाही, अशी टीका राज यांनी केली.

राज्यातील 24 हजार गावं, 151 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचं सरकारनं जाहीर केलं. मग सरकारनं पाण्यासाठी काय योजना केल्या? राज्यात 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या असा दावा मुख्यमंत्री करतात. कुठे आहेत या विहिरी? असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले. राज्यातील परिस्थिती भीषण आहे. पाण्याची समस्या गंभीर आहे. नोकऱ्या नाहीत. माणसांचे तांडेच्या तांडे शहरांकडे चालले आहेत. मग मोदींनी दाखवलेल्या स्वप्नांचं काय झालं? असा सवाल राज यांनी विचारला. 


Web Title: lok sabha election mns chief raj thackeray slams cm devendra fadnavis over water problem farmer suicide
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.