"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:39 IST2024-10-09T16:32:57+5:302024-10-09T16:39:22+5:30
PM Modi Maharashtra Vidhan Sabha Elections: हरयाणा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हल्ला चढवला. मुस्लिमांमधील जातींचा विषय येतो तेव्हा काँग्रेस नेते तोंडाला कुलूप लावून बसतात, असे मोदी म्हणाले.

"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
PM Modi Maharashtra Assembly Elections 2024: हरयाणाचे निकाल लागल्यानंतर भाजपाचा आत्मविश्वास बळावला आहे. भाजपा नेते काँग्रेसवर हल्ला चढवताना दिसत असून, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसचा प्रत्येक कट उधळून लावण्याचे आव्हान केले. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालये आणि इतर कामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसचे नेते तोंडाला कुलूप लावून बसतात -मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसचा फॉर्म्युला स्पष्ट आहे की, मुस्लिमांना घाबरवायचे, त्यांना भीती दाखवायची. त्याचे रुपांतर व्होटबँकेत करायचं. ती मजबूत करायची. काँग्रेसच्या एकाही नेत्यांने आजपर्यंत कधीही विचारलं नाही की, आपल्या मुस्लीम भाऊ-बहिणींमध्ये किती जाती असतात? मुस्लिमांमधील जातींचा विषय येताच काँग्रेस नेते तोंडाला कुलूप लावून बसतात; पण जेव्हा हिंदूंचा विषय येतो. तेव्हा काँग्रेस ही चर्चा जातींपासूनच सुरू करते."
"हिंदू समाजातील एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवत ठेवायचं, ही काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेसला माहितीये की, जितकी हिंदूमध्ये फूट पडले, तितकाच त्यांना फायदा होईल. हिंदू समाजात आग भडकत राहावी, असे काँग्रेसला वाटत राहते. कारण त्यावर राजकीय भाकऱ्या भाजता येतील. भारतात जिथे कुठे निवडणुका होतात, तिथे काँग्रेस हा फॉर्म्युला अंवलंबते", अशी टीका मोदींनी केली.
हिंदू समाजात फूट पाडण्याचा काँग्रेसचा फॉर्म्युला, मोदी काय म्हणाले?
"आपली व्होटबँक मजबूत करण्यासाठी काँग्रेस समाजात द्वेष पसरवण्यासाठी अनेक गोष्टी करत आहे. हिंदू समाजात फूट पाडून त्याला विजयाचा फॉर्म्युला बनवणे, हेच काँग्रेसच्या राजकारणाचा आधार आहे. काँग्रेस भारताच्या सर्वजण हिताय, सर्वजण सुखायला नख लावत आहे", अशी घणाघाती हल्ला मोदींनी काँग्रेसवर केला.
"महात्मा गांधी म्हणाले होते की, काँग्रेसचं विसर्जन करायला हवे. पण, काँग्रेस स्वतः संपली नाही; आज देशाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपाल्याला सतर्क राहायचं आहे. मला विश्वास आहे की, समाजाला तोडण्याचे जे प्रयत्न आज होत आहेत, असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील. महाराष्ट्रातील लोकांनी देशाच्या विकासाला सर्वोच्च स्थानी ठेवून भाजपा महायुतीला मतदान करावं. हरयाणा तर भाजपा जिंकली, आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे", असे आवाहन मोदींनी केले.