'30 वर्षे पक्षासाठी काम करुनही न्याय मिळत नाही', सेनेच्या विदर्भातील एकमेव आमदाराने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 13:06 IST2021-07-14T12:54:41+5:302021-07-14T13:06:11+5:30
Shivsena MLA Ashish Jaiswal: नागपूरमधील रामटेकचे चार टर्म आमदार आशिष जैसवाल पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

'30 वर्षे पक्षासाठी काम करुनही न्याय मिळत नाही', सेनेच्या विदर्भातील एकमेव आमदाराने व्यक्त केली खंत
नागपूर: कालच शिवसेनेचे(shivsena) माजी राज्यमंत्री अशोक शिंदे(ashok shinde) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर, आता विदर्भातील सेनेचा मोठा नेता पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरमधीलरामटेकमधून शिवसेनेच्या तिकीटावर चारवेळा निवडणूक आलेले आशिष जैसवाल(ashish jaiswal) पक्षावर नाराज आहेत. 'बाहेरच्यांना मंत्रिपदे मिळतात, पण प्रामाणिक शिवसैनिकांना न्याय मिळत नाही,' अशी खंत त्यांनी बोलून दाखवलीये.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना जैसवाल म्हणाले की, विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही, मग पक्षाची वाढ कशी होणार ? मी 30 वर्षे सेनेत काम केले, पण कधीच न्याय मिळाला नाही. पक्ष बाहेरुन आलेल्यांना संधी देतो, पण प्रामाणिक शिवसैनिकांना न्याय मिळत नाही. आपल्या नेत्याला संधी मिळत नसल्याने कार्यकर्तेही नाराज असल्याचे जैसवाल यांनी सांगितले.
शिवसेनेला काँग्रेसचा 'दे धक्का...'
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद असल्याचं समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीने(ncp) काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता काँग्रेसने शिवसेनेला ‘दे धक्का’ देण्याचे ठरवले. शिवसेनेचे उपनेते आणि युती काळातील राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. वर्धाच्या हिंगणघाट येथील माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचे ठरवले आहे. दिल्लीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशोक शिंदे यांच्यासोबत ठाणे, भिवंडी येथील सुरेश म्हात्रे यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. सुरेश म्हात्रे यांनी याआधीच शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसणार आहे.