राष्ट्रवादीच्या जागा भाजपकडून ‘टार्गेट’; राष्ट्रवादीचीही उमेदवार खेचण्याची व्यूहरचना, दोघांमध्ये खेचाखेची
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:24 IST2025-12-27T19:22:46+5:302025-12-27T19:24:35+5:30
Pimpri Chinchwad Municipal Corporation Election राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने वर्चस्व कायम ठेवण्यासाठी महापालिकेत स्वबळाचा नारा दिला आहे, तर भाजपनेही कंबर कसली आहे

राष्ट्रवादीच्या जागा भाजपकडून ‘टार्गेट’; राष्ट्रवादीचीही उमेदवार खेचण्याची व्यूहरचना, दोघांमध्ये खेचाखेची
पिंपरी : महापालिकेच्या २०२७ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल्या ३६ जागा आता भाजपने लक्ष्य केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) आणि इतर पक्षांतील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना पक्षात खेचण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे पॅनेल फोडण्याचाही प्रयत्न आहे, तर मागीलवेळी भाजप ज्या ठिकाणी दुसऱ्या स्थानावर होती, तेथील उमेदवार आपल्याकडे ओढण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिशन लोटस’ राबविले. भाजपची सत्ता यावी, यासाठी तत्कालीन एकत्रित राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोहरे फोडले. निवडणुकीपूर्वी भोसरीतून एकाच वेळी १८ जणांना प्रवेश दिला होता. चिंचवडमधील १२ नगरसेवक भाजपमध्ये आले होते. तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी प्रभाग रचनेपासून उमेदवारीपर्यंत राष्ट्रवादीची जिरवण्याची व्यूहरचना केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. भाजपला ७७ जागांचे यश मिळाले. पुढे पाच अपक्षांची साथ मिळाली. राष्ट्रवादीला ३६ जागा मिळाल्या.
आता भाजप-राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार)मध्ये खेचाखेची
आता राज्यातील सत्तेत सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने वर्चस्व कायम ठेवण्यासाठी महापालिकेत स्वबळाचा नारा दिला आहे. भाजपनेही कंबर कसली आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जागा आल्या होत्या, त्या ठिकाणी सक्षम उमेदवार देण्यासाठी किंवा राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार)तील उमेदवार खेचण्यास भाजपने सुरुवात केली आहे.
भाजपमध्ये यांचे इनकमिंग
तत्कालीन राष्ट्रवादीत असलेले माजी महापौर संजोग वाघेरे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष उषा वाघेरे, राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे, महापौर माजी महापौर राजू मिसाळ, त्याचबरोबर माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक संजय काटे, आशा सूर्यवंशी, प्रवीण भालेकर, समीर मासुळकर, प्रसाद शेट्टी, जालिंदर शिंदे यांना भाजपने प्रवेश दिला आहे. पदे देऊनही अनेकांनी साथ सोडल्याने अजित पवार अस्वस्थ आहेत. महापालिकेत गतवेळी शिवसेनेच्या नऊ जागा होत्या. त्यापैकी सात जण भाजपमध्ये आले आहेत.
हे भाजपमधून बाहेर पडले
भाजपमधून तुषार कामठे सुरुवातीलाच बाहेर पडले होते. आता भाजपच्या स्थायी समिती सभापती सीमा सावळे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह अनेक जण राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार)ची ताकदही वाढली आहे. भाजपने राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) या पक्षांना शह देण्यासाठी फोडाफोडी सुरू केली आहे.
गतवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेले प्रभाग
१) चारही सदस्य निवडून आलेले : प्रभाग ९ नेहरूनगर, प्रभाग १२ तळवडे.
२) चारपैकी तीन सदस्य निवडून आलेले : प्रभाग २० संत तुकारामनगर, प्रभाग २१ पिंपरीगाव. प्रभाग २२ काळेवाडी, प्रभाग ३० दापोडी.
३) दोन सदस्य निवडून आलेले : प्रभाग ५ गव्हाणे वस्ती, प्रभाग १४ आकुर्डी गावठाण, प्रभाग १६ रावेत, किवळे, प्रभाग २८ पिंपळे सौदागर,
४) चारपैकी एक सदस्य निवडून आलेले : प्रभाग १ चिखली, प्रभाग ३ चऱ्होली, प्रभाग ८ इंद्रायणीनगर, प्रभाग १३ निगडी गावठाण, प्रभाग १५ प्राधिकरण, प्रभाग १८ चिंचवडगाव, प्रभाग २४ थेरगाव, गणेशनगर, प्रभाग २५ वाकड गावठाण.