PCMC Election 2026: शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकून बिल्डरांना मोकळे रान; लांडगेंच्या मतदारसंघात अजित पवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:46 IST2026-01-12T13:45:16+5:302026-01-12T13:46:52+5:30
PCMC Election 2026 आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता त्यांना इशारा देताना म्हणाले की, ‘डर जाऊ आसानीसे मैं वो कश्ती नहीं हूं. मिटा सको तुम मुझे यह बात तुम्हारे बस की नहीं...

PCMC Election 2026: शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकून बिल्डरांना मोकळे रान; लांडगेंच्या मतदारसंघात अजित पवारांची टीका
पिंपरी : मोशी-चिखली-जाधववाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकून बिल्डरांना मोकळे रान दिले आहे. टीडीआर घेताना आमच्याकडून घ्या असा दबाव टाकून कामे अडवली जातात, अशा तक्रारी आहेत. काही लोक धर्मात अंतर वाढवत आहेत. भावनिक केले जात आहे. मी कधीही त्याला थारा देत नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ जाधववाडी, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, दिघी रोड भोसरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना शायरीतून उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शायरीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ‘हर पंख फैलानेवाला परिंदा उड नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशामेंही टूटते जाते हैं. हुनर की बाते करने से कुछ नही होता, जमाना उसी को पहचानता हैं, जो मैदानमें उतरकर साबित करे’. आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता त्यांना इशारा देताना म्हणाले की, ‘डर जाऊ आसानीसे मैं वो कश्ती नहीं हूं. मिटा सको तुम मुझे यह बात तुम्हारे बस की नहीं’.
जन्मभूमी बारामती, कर्मभूमी पिंपरी-चिंचवड
पवार म्हणाले की, ‘ते’ उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे स्वार्थी लोक आहेत. आता दमदाटी करत आहेत. मात्र, कोणाला काही घाबरायचे नाही. अनधिकृत बांधकामे होऊनच दिली नसती, तर नुकसान झाले नसते. माझी जन्मभूमी बारामती, पण कर्मभूमी पिंपरी-चिंचवड आहे.
अजित पवार म्हणतात...
- मुलाला निवडणूक लढवता येऊ नये, यासाठी किसन तापकीर यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले.
- बिघडवलेले शहर चांगले अधिकारी आणून दुरुस्त करू. गुंड उभे करून अधिकाऱ्यांकडून केली जाणारी कामे थांबवू.
- सफाईसाठी झाडूखात्यात दहा हजार कामगार दाखवून प्रत्यक्षात पाच हजार लोकच काम करून लूट सुरू आहे.
- इंद्रायणी सायक्लोथॉनच्या नावाने उपक्रम राबवतात. मात्र, इंद्रायणीत जलपर्णी तशीच आहे.
- आमदारांच्या भावाची ओळख ‘कार्तिक सर’ नसून ‘आर्थिक सर’ आहे.
- मोशी-चिखली-जाधववाडीतील विकास आराखड्यात केवळ २५ टक्के आरक्षण विकसीत. बिल्डरांच्या जागा वगळून शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षणे.
- टँकर माफिया सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्च्यांचे असून, त्यांचे पैशांचे मीटर सुरू आहे.
- माजी महापौरांच्या आश्वासनांमुळे उभी राहिलेली अनधिकृत ३८ घरे पाडण्याची वेळ.
- ७५ वर्षांवरील लोकांना मोफत बस सुविधा देण्याचे भाजपचा जाहीरनामा कधी पूर्ण होणार?
- टेंडर प्रक्रियेत पाच ते सहा टक्के कमिशन घेतले जाते. ही पद्धतच बंद करण्याचा मानस आहे.