Irfan Pathan : केव्हीन पीटरसनच्या वादळी खेळीला इरफान पठाणचे सडेतोड उत्तर, मनप्रीत गोनीच्या फटकेबाजीनं इंग्लंडचे गोलंदाज निरूत्तर

Road Safety World Series Irfan Pathan Manpreet Gony नमन ओझा ( १२) बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी २६ चेंडूंत ७० धावांची गरज होती. इरफान पठाणनं गोलंदाजीतही कमाल दाखवली.

Road Safety World Series : इंग्लंड लिजंड ( England Legends) च्या १८९ धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग ही जोडी अपयशी ठरल्यानंतर भारत लिजंड ( India Legends) संघाची अवस्था ६ बाद ९९ अशी दयनीय झाली होती.

भारतीय संघ हा सामना पराभूत होईल, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. पण, इरफान पठाण ( Irfan Pathan) आणि मनप्रीत गोनी ( Manpreet Gony) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात थरार पाहायला मिळाला. गोनीनं तर १०३ मीटर लांब षटकार खेचून इंग्लंडचा कर्णधार केव्हीन पीटरनसच्या ( Kevin Peterson) मनात धडकी भरवली होती. इरफान व गोनी यांनी २६ चेंडूंत ६३ धावांची नाबाद खेळी करताना टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले, परंतु अवघ्या सहा धावांनी इंग्लंडनं हा सामना जिंकण्यात यश मिळवलं.

बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा पीटरसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघासमोर कस लागला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं ७ बाद १८८ धावा चोपल्या.

४० वर्षीय पीटरसननं १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. पीटरसननं ३७ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांची वादळी खेळी केली. डॅरेन मॅडीनं २९ धावा केल्या. भारताकडून युसूफ पठाण ( Yusuf Pathan) यानं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मुनाफ पटेल व इरफान पठाण यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकार वीरेंद्र सेहवाग ( ६) बाद झाला. त्यानंतर माँटी पानेसरनं भारतीय संघाला धक्के दिले. पानेसरनं तेंडुलकरला चकवा देत माघारी पाठवले. पानेसरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न फसला अन् तेंडुलकरला ( ९) यष्टिचीत होऊन माघारी जावे लागले.

मोहम्मद कैफ ( १), एस बद्रीनाथ ( ८) हेही अपयशी ठरले. युवराज सिंगनं २१ चेंडूंत २२ धावा केल्या, तर यूसूफला १७ धावाच करता आल्या. नमन ओझा ( १२) बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी २६ चेंडूंत ७० धावांची गरज होती.

इरफान पठाण व मनप्रीत गोनीनं दमदार खेळ केला. इरफाननं ३४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६१ धावा केल्या.

गोनीनं इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. त्यानं १६ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह नाबाद ३५ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज असताना भारताला १२ धावाच करता आल्या. भारतानं ७ बाद १८२ धावा केल्या.