करण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 08:43 PM2020-09-27T20:43:18+5:302020-09-27T20:52:52+5:30

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना बॉलिवूडमधलं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं इंडस्ट्रीतल्या बड्या कलाकारांची चौकशी सुरू केली.

सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती अमली पदार्थ मागवत असल्याचे पुरावे हाती लागल्यानंतर तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली. सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांची चौकशी सुरू आहे.

अमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूडच्या कलाकारांची नावं समोर येऊ लागताच करण जोहरच्या एका पार्टीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीत अमली पदार्थांचं सेवन झाल्याची चर्चा होती. त्यामुळे आता ही पार्टी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर आहे. या पार्टीचा व्हायरल व्हिडीओ खरा असून तो एडिटेड नसल्याचं फॉरेन्सिकच्या अहवालातून समोर आलं आहे.

फॉरेन्सिक विभागानं आपला अहवाल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला पाठवला आहे. या व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारचं एडिटींग नसल्याचं फॉरेन्सिक विभागानं अहवालात नमूद केलं आहे.

या प्रकरणात लवकरच डीडीजी अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे. या बैठकीला एनसीबीचे अधिकारी उपस्थित असतील. यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येईल.

२०१९ मध्ये झालेल्या पार्टीवरून करण जोहरनं याआधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मी अमली पदार्थ घेत नाही आणि ते घेण्यासाठी प्रोत्साहनही देत नाही, असं करण जोहरनं म्हटलं होतं.

२८ जुलै २०१९ ला माझ्या घरात झालेल्या पार्टीत अमली पदार्थांचं सेवन करण्यात आलं, हा आरोप धादांत खोटा आहे, असा दावा करणनं केला.

एनसीबीनं अमली पदार्थ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या क्षितिज आणि अनुभवला मी ओळखत नाही. ते धर्मा प्रॉडक्शनचे अधिकारी नाहीत. क्षितिज नोव्हेंबर २०१९ मध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करत होता. तर अनुभवनं प्रॉडक्शनसोबत केवळ दोन महिने काम केल्याचं करणनं म्हटलं.

करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीला १२ बडे कलाकार उपस्थित होते. त्यामुळे या कलाकारांच्या अडचणी वाढू शकतात.