निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:17 IST2025-11-21T12:16:05+5:302025-11-21T12:17:05+5:30
पोलिसांनी सुरू केला निर्दयी आईचा शोध!

निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
Rajasthan News: राजस्थानची राजधानी जयपूरमधून आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर ली आहे. येथील चांदपोल मोक्षधाम (श्मशानभूमी) बाहेर सोमवारी 10 दिवसांची नवजात बालिका लावारिस अवस्थेत आढळली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक धावून आले. त्याच वेळी तेथून जात असलेल्या वाहतूक पोलिसांच्या महिला टीआय कविता शर्मा यांनी बाळाला आपल्या कुशीत घेतले. सध्या या घटनेचा फोटो व्हायरल होत आहे.
एका महिलेची निर्दयता तर, दुसरीची ममता
या घटनेच्या दोन वेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. एका बाजूला आईची निर्दयता, जिने कडाकाच्या थंडीत चिमुकलीला टाकून दिले. तर दुसऱ्या बाजूला एक महिला पोलिस अधिकाऱ्याची ममता, जिने क्षणभरात त्या चिमुकलीसाठी आईची भूमिका निभावली.
नेमके काय घडले?
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सकाळी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून लोक जमा झाले. त्याच वेळी तिथून जात असलेल्या टीआय कविता शर्मा यांनी गर्दी पाहून त्वरित वाहन थांबवले. परिस्थिती कळताच त्या थेट बाळापाशी पोहोचल्या आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बाळाला कुशीत घेतले. कुशीत येताच बाळ शांत झाले. हे दृष्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.
बालिकेला तात्काळ रुग्णालयात दाखल
यानंतर टीआय शर्मांनी कंट्रोल रुम आणि स्थानिक पोलिस ठाण्याला माहिती दिली. प्राथमिकता म्हणून बाळाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून तिची प्रकृती पूर्णपणे ठीक असल्याचे सांगितले. आवश्यक उपचार आणि देखभाल केल्यानंतर पोलिसांनी बाळाला चाइल्ड वेल्फेअर कमिटीकडे सोपवले आहे.
आईचा शोध सुरू
पोलिसांनी आता या अमानवीय कृत्यामागील व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीवी फुटेज तपासली जात आहे. मागील 8-10 दिवसांतील सरकारी व खाजगी रुग्णालयांचे जन्म नोंदवही छाननी केली जात आहे.
स्थानिकांचा संताप
घटनेने स्थानिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. नवजात बाळाला अशा प्रकारे टाकून दिले जाणे हे समाजातील गंभीर संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारे असल्याचे लोकांचे मत आहे. दुसरीकडे, टीआय कविता शर्मा यांची तात्काळ कारवाई, करुणा आणि ममतेने केलेली हाताळणी याचे कौतुक होत आहे.