'माझा 100 दिवसांचा प्लॅन तयार आहे...', लोकसभेपूर्वीच मोदींनी सुरू केली तिसऱ्या टर्मची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 07:39 PM2024-04-15T19:39:11+5:302024-04-15T19:40:52+5:30

'आपल्या देशाला अजून कशाची गरज आहे, हे मी जाणतो. 2047 डोळ्यासमोर ठेवून मी गेली दोन वर्षे काम करत आहे.'

PM Narendra Modi Interview: 'My 100 days plan is ready', Modi started preparations for third term before Lok Sabha | 'माझा 100 दिवसांचा प्लॅन तयार आहे...', लोकसभेपूर्वीच मोदींनी सुरू केली तिसऱ्या टर्मची तयारी

'माझा 100 दिवसांचा प्लॅन तयार आहे...', लोकसभेपूर्वीच मोदींनी सुरू केली तिसऱ्या टर्मची तयारी

PM Narendra Modi Interview: लोकसभा निवडणुकीचा प्रचार शीगेला पोहचला आहे. सर्व पक्षांचे नेते विविध ठिकाणी रॅली-प्रचारसभा घेत आहेत. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विरोधकांना तुरुंगात पाठवल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपांचे खंडन करत म्हटले की, अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवलेले बहुतांश खटले अशा व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध आहेत, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. प्रामाणिक व्यक्तीला घाबरण्याचे कारण नाही, परंतु भ्रष्टाचारी लोकांना सोडले जाणार नाही. यासोबतच त्यांनी तिसऱ्या टर्मची तयारी सुरू असून, 100 दिवसांच्या योजना तयार असल्याचा दावाही केला. 

मोदी आपल्या प्रत्येक भाषणात 2024 नाही, तर 2047 लक्ष्य असल्याचे सांगतात. याबाबत बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे 25 वर्षांचे व्हिजन आहे. जेव्हा देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर अमृत महोत्सव साजरा करत होता, त्यावेळी मी हा विषय सर्वांसमोर ठेवायला सुरुवात केली. 2047 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील, साहजिकच हा टप्पा खुप मोठा आहे. या येणाऱ्या 25 वर्षांचा सदुपयोग कसा करावा, हे प्रत्येकाने निश्चित केले पाहिजे. तिसऱ्या टर्मबाबत बोलताना मोदी म्हणाले, यासाठी आमचा 100 दिवसांचा प्लॅन तयार आहे. अजून देशासाठी खूप काही करायचे आहे.

आपल्या देशाला अजून किती आणि कशाची गरज आहे, हे मी जाणतो. म्हणूनच मी नेहमी म्हणतो की, जे झाले ते ट्रेलर आहे, अजून खूप बाकी आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच मी याबाबत नियोजन सुरू केले होते. 2047 डोळ्यासमोर ठेवून मी गेली दोन वर्षे काम करत आहे. येत्या 25 वर्षात देश कसा असावा, याबाबत मी देशातील सुमारे 15 लाख लोकांकडून सूचना घेतल्या. पुढील 25 वर्षांच्या व्हिजनसाठी प्रत्येक विभागात अधिकाऱ्यांची टीम तयार केली. एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार करत आहोत. निवडणूक झाल्यानंतर NITI आयोगाची बैठक बोलावून सर्वसमावेशक चर्चा केली जाईल. निवडणुका संपल्याबरोबर सर्व राज्यांनी यावर काम करावे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

 

मोदी पुढे म्हणाले, 2019 च्या निवडणुकीतही मी 100 दिवसांचे काम घेऊन मैदानात उतरलो होतो. आमची पुन्हा सत्ता आली, तेव्हा पहिल्या 100 दिवसांत कलम 370 रद्द केली, पहिल्या 100 दिवसांत मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकपासून मुक्त केले. सुरक्षेसंदर्भातील UAPA विधेयक 100 दिवसांत मंजूर झाले. बँकांचे विलीनीकरण हे मोठे काम होते, ते आम्ही 100 दिवसांत पूर्ण केले. एवढेच नाही तर, मी जवळपास 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करुन जनावरांच्या लसीकरणासाठी मोठी मोहीम राबवली. हे सर्व मी पहिल्या 100 दिवसात केले. त्यामुळे 100 दिवसांत मला कोणते काम करायचे, याचे नियोजन मी आधीच करतो.

राम मंदिर, सनातन, ईडी-सीबीआय ते इलेक्टोरल बाँड्स... PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Web Title: PM Narendra Modi Interview: 'My 100 days plan is ready', Modi started preparations for third term before Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.