मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:17 IST2025-08-13T13:14:40+5:302025-08-13T13:17:16+5:30
PM Modi Varanasi: लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या 14 महिन्यानंतर वाराणसीत काँग्रेस नेते अजय राय यांच्या नावाने जल्लोष करण्यात आला.

मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
PM Modi Varanasi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपावरुन केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये अनोखा निषेध पाहायला मिळाला. मोदींविरोधात निवडणूक लढवणारे यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांच्या निवासस्थानी समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते गुलाबाची फुले, हार आणि मिठाई घेऊन पोहोचले. 'वाराणसीचे खासदार कोण, अजय राय..अजय राय'! अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. वातावरण असे झाले, जणू काय अजय राज निवडून आले आहेत.
लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. परंतु मतचोरीच्या आरोपावरुन काँग्रेसने भाजप सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. वाराणसीमध्ये तर अजय राय यांनाच वाराणसीचे 'खरे खासदार' मानून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. वाराणसीच्या लोकांनी अजय राय यांनाच विजयी केले होते, मात्र प्रशासकीय हेराफेरीमुळे निकाल उलटला, असा दावा सपाच्या कार्यकर्त्यांचा यावेळी केला.
समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा अजय राय यांनीदेखील हसतमुखाने त्यांचे स्वाग केले. तसेच, कार्यकर्त्यांनी आणलेले हार-फूल आणि मिठाई स्विकारली. माझ्यावर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या साडेचार लाख मतदारांचा मी ऋणी आहे. काशीच्या लोकांनी दिलेले प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी अमूल्य आहे, अशी प्रतिक्रिया अजय राय यांनी यावेळी दिली.
सपा कार्यकर्त्यांचे आरोप
अजय राय यांच्या घरी पोहोचलेले सपा कार्यकर्ते अमन यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वाराणसीच्या लोकांनी अजय राय यांना विजयी केले होते, परंतु सरकारी यंत्रणेच्या मदतीने निकाल बदलला गेला. अजय राय इंडिया आघाडीचे उमेदवार होते, तेच आमच्यासाठी खरे खासदार आहेत, असा दावा यादव यांनी यावेळी केला.