आमचे ‘भ्रष्टाचार हटाओ’, विरोधकांचे ‘मोदी हटाओ’, प्रचारसभेत नरेंद्र मोदींचा ‘इंडिया’वर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 09:13 IST2024-04-05T08:44:44+5:302024-04-05T09:13:03+5:30
Lok Sabha Election 2024: “नेहमी एकमेकांशी भांडणारे देशातील सर्व भ्रष्ट लोक आज मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. मी म्हणतो भ्रष्टाचार हटवा, ते म्हणतात भ्रष्टाचारी वाचवा, मोदी हटवा,” अशी टीका करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बिहारमधील जमुई येथून लोकसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले.

आमचे ‘भ्रष्टाचार हटाओ’, विरोधकांचे ‘मोदी हटाओ’, प्रचारसभेत नरेंद्र मोदींचा ‘इंडिया’वर निशाणा
- एस. पी. सिन्हा
जमुई - “नेहमी एकमेकांशी भांडणारे देशातील सर्व भ्रष्ट लोक आज मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. मी म्हणतो भ्रष्टाचार हटवा, ते म्हणतात भ्रष्टाचारी वाचवा, मोदी हटवा,” अशी टीका करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जमुई येथून लोकसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले.
पंतप्रधान मोदी यांनी स्थानिक भाषेत सभेला सुरुवात केली. यानंतर जनतेने एका आवाजात ‘विजयी सभा’ असा हुंकार भरला. “आज जमुईच्या या सुंदर भूमीवर जमलेली ही गर्दी सांगतेय की, लोकांचा मूड काय आहे? जमुईमधून भाजप आणि एनडीएच्या बाजूने उठलेला हा आवाज संपूर्ण देशात गुंजत आहे,” असे मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी भाषणात लालू कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला. रेल्वेत भरतीच्या नावाखाली गरीब तरुणांकडून जमिनी नावावर करून घेणारे राज्यातील तरुणांचे कधीही भले करू शकत नाहीत. एनडीएचे सरकार सौरऊर्जा आणि एलईडी दिव्यांबद्दल बोलते, दुसरीकडे अहंकारी आघाडीच्या लोकांना बिहारला कंदील युगात ठेवायचे आहे, असा हल्लाही त्यांनी केला.
आजचा भारत घराघरांत घुसून मारतो
आजचा भारत घराघरांत घुसून मारतो. आजचा भारत जगाला दिशा दाखवतो. अवघ्या १० वर्षांत भारताची प्रतिष्ठा कशी वाढली, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे. नक्षलवाद संपला. जे नक्षलवादाच्या मार्गाने भरकटले आहेत, त्यांना योग्य मार्गावर आणले आहे, असे मोदी म्हणाले.
आता इकडे-तिकडे जाणार नाही : नितीश
प्रचारसभेला पंतप्रधानांसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारही होते. त्यांनी आता इकडे-तिकडे जाणार नसल्याचा पुनरुच्चार करीत एनडीए सोबतच राहणार असल्याची ग्वाही दिली. पंतप्रधान मोदी यांनी १० वर्षांत खूप काम केले, अशी प्रशंसाही त्यांनी केली.
भारताच्या भविष्यासाठी निर्णायक निवडणूक
बिहारच्या भूमीने स्वातंत्र्यलढ्यात मोठी भूमिका बजावली आहे. मात्र, बिहारच्या क्षमतेला न्याय मिळाला नाही. एनडीए आघाडीने मोठ्या कष्टाने बिहारला एका मोठ्या दलदलीतून बाहेर काढले आहे. नितीशकुमारांनी मोठी भूमिका बजावली आहे, असे मोदी म्हणाले.