NDA or INDIA एनडीए की इंडिया? तेलुगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 13:56 IST2024-06-05T13:19:48+5:302024-06-05T13:56:16+5:30
Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला असून, भाजपाचं (BJP) बहुमत हुकल्यानंतर केंद्रातील सत्तास्थापनेबाबत वेगवेगळे तर्क आणि शक्यता वर्तवल्या जात असून, चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

NDA or INDIA एनडीए की इंडिया? तेलुगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला मोठा निर्णय
लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल Lok Sabha Election 2024 लागून, दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मागच्या दोन निवडणुकांत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला यंदा मात्र बहुमताने हुकलावणी दिली आहे. तर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताचं सरकार स्थापन करण्याइतपत जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपाचं बहुमत हुकल्यानंतर केंद्रातील सत्तास्थापनेबाबत वेगवेगळे तर्क आणि शक्यता वर्तवल्या जात असून, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी त्यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएमध्येच राहणार आहे. तसेच पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा केली आहे. तसेच आपण आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला २४० जागा जिंकण्यात यश आलं असून, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९४ जागा जिंकल्या आहेत. एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम पक्ष १६ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाच्या सत्तास्थापनेमध्ये आणि पुढील सरकारमध्ये या दोन्ही नेत्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.