जागा २०, पण भाजपानं ताकद लावली 'या' ६ ठिकाणी; ‘इंडिया’ आघाडीचे पक्ष आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:54 AM2024-04-24T10:54:59+5:302024-04-24T10:55:40+5:30

भाजप राहिला बाजूला आणि या दोन घटक पक्षांतच विविध मतदारसंघांत जुंपल्याचे चित्र सध्या दिसते आहे. तर, या वर्षात तीनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळचा दौरा केला.

Kerala Lok Sabha Elections - BJP Focused on 6 Seats, Constituent Parties of India Aghadi are fighting against each other | जागा २०, पण भाजपानं ताकद लावली 'या' ६ ठिकाणी; ‘इंडिया’ आघाडीचे पक्ष आमनेसामने

जागा २०, पण भाजपानं ताकद लावली 'या' ६ ठिकाणी; ‘इंडिया’ आघाडीचे पक्ष आमनेसामने

तिरुअनंतपुरम : यापूर्वीच्या निवडणुकांत कर्नाटक वगळता दक्षिण भारतात भाजप अस्तित्वहीन पक्ष होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून भाजपने पद्धतशीरपणे दक्षिणी राज्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूप्रमाणेच केरळ या राज्याचाही त्यात समावेश आहे. सध्या भाजपने या राज्यात सहा मतदारसंघांकडे लक्ष केंद्रित केले असले तरी पक्षाचा मुख्य उद्देश राज्यात चंचूप्रवेश करण्याचाच आहे. मात्र, इंडिया आघाडीतील दोन घटक पक्ष काँग्रेस आणि सीपीआय या राज्यातील सर्व २० लोकसभा मतदारसंघांत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. त्यात राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघाचाही समावेश आहे.

राहुल हे मोठे नेते आहेत त्यांनी मित्र पक्षाविरुद्ध निवडणूक लढविण्याऐवजी देशात इतरत्र थेट भाजपाशी दोन हात करावे, असे आवाहन सीपीआयने केले होते. भाजप राहिला बाजूला आणि या दोन घटक पक्षांतच विविध मतदारसंघांत जुंपल्याचे चित्र सध्या दिसते आहे. तर, या वर्षात तीनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळचा दौरा केला. त्याचे मतांत किती रूपांतर होते, हे पाहावे लागेल. केरळमध्ये दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी राज्यातील सर्व मतदारसंघांत मतदान होणार आहे.

या जागांवर भाजपचे लक्ष्य 
पलक्कड, कासारगोड, थ्रिसूर, पथनमथीहत्ता व थिरुअनंतपुरम. दोन नगरपालिका आणि २० पंचायतींवर सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपने केरळमध्ये २०१६ साली थिरुअनंतपुरम विधानसभेची जागा जिंकली होती; पण २०२१ साली झालेल्या निवडणुकीत ती टिकवता आली नाही.

या मतदारसंघांवर फाेकस
भाजपने सहा असे मतदारसंघ निश्चित केले आहेत, जिथे भाजपने मागच्या निवडणुकीत किमान २५ टक्के मते मिळवली होती. थिरुअनंतपुरम आणि थ्रिसूरसह हे मतदारसंघ भाजपने ए कॅटेगरीत टाकलेले आहेत. थिरुअनंतपुरममध्ये काँग्रेसच्या शशी थरूर यांच्या विरोधात भाजपने आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना रिंगणात उतरवले आहे. सीपीआयतर्फे पन्नीयन रवींद्रन लढत आहेत. या मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने ३० टक्के एवढी लक्षणीय मते मिळवली होती.

या ठिकाणी आलटून पालटून संधी
थ्रिसूर मतदारसंघही भाजपने प्रतिष्ठेचा बनवला असून, येथून सिने अभिनेते सुरेश गोपी भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. सीपीआयचे व्ही. एस. सुनील कुमार आणि काँग्रेसचे के. मुरलीधरन हेही शर्यतीत आहेत. गेल्या ७२ वर्षांत या मतदारसंघात सीपीआय आणि काँग्रेसचे उमेदवार आलटून पालटून निवडून आले आहेत. यंदा मात्र भाजपला वाटतेय की, या मतदारसंघात आपल्याला संधी आहे.

Web Title: Kerala Lok Sabha Elections - BJP Focused on 6 Seats, Constituent Parties of India Aghadi are fighting against each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.