झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:42 IST2024-11-26T16:32:41+5:302024-11-26T16:42:25+5:30
Jharkhand Assembly Election 2024 Result: झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, आरजेडी आणि डाव्या पक्षांच्या आघाडीने ८१ पैकी ५६ जागा जिंकत दणदणीत बहुमत मिळवलं आहे. आता इंडिया आघाडीकडून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. मात्र बदललेल्या सत्तासमीकरणांमुळे नव्या सरकारमध्ये काँग्रेसची झोळी खाली राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
नुकत्याच झालेल्या दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीपैकी महाराष्ट्रात काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र दुसरीकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सत्ता आली आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, आरजेडी आणि डाव्या पक्षांच्या आघाडीने ८१ पैकी ५६ जागा जिंकत दणदणीत बहुमत मिळवलं आहे. आता इंडिया आघाडीकडून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. मात्र बदललेल्या सत्तासमीकरणांमुळे नव्या सरकारमध्ये काँग्रेसची झोळी खाली राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमध्ये काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केली होती. मात्र झारखंड मुक्ती मोर्चाने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता किमान चार मंत्रिपदं मिळावीत, यासाठी काँग्रेसकडून वाटाघाटी सुरू आहेत. मात्र त्यामध्येही पक्षाला यश मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे आता झारखंडमध्येही काँग्रेसची अवस्था ही जम्मू काश्मीरसारखी होईल, असा दावा केला जात आहे.
जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेससोबत निवडणूक लढणाऱ्या नॅशनल कॉन्फ्रन्स पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर नॅशनल कॉन्फ्रन्सने अपक्ष आणि छोट्या पक्षांसह बहुमताचा आकडा गाठत मंत्रिमंडळामधील काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर संपवून टाकली. विधानसभेच्या ८१ जागा असलेल्या झारखंडमध्ये बहुमताचा आकडा ४१ असून, झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला ३४ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या आहे. इंडिया आघाडीतील इतर पक्षांना ६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्याशिवायही झारखंड मुक्ती मोर्चा बहुमताजवळ पोहोचत आहे. त्यामुळे आता झारखंडमधील नव्या सरकारमध्ये काँग्रेसच्या हाती फार काही लागण्याची शक्यता कमी आहे.