VIDEO: लाजिरवाणी घटना; बेवारस मृतदेह ई-रिक्षातून नेला, पाय-तोंड बाहेर लटकत राहिले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 18:19 IST2023-01-22T18:18:22+5:302023-01-22T18:19:44+5:30
राजधानी जयपूरमध्ये पोलिसांचे लाजिरवाणे कृत्य एका व्हिडिओतून समोर आले आहे.

VIDEO: लाजिरवाणी घटना; बेवारस मृतदेह ई-रिक्षातून नेला, पाय-तोंड बाहेर लटकत राहिले...
जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्येपोलिसांचे लाजिरवाणे कृत्य एका व्हिडिओतून समोर आले आहे. पोलिसांना रस्त्यावर एक बेवारस मृतदेह आढळला, त्या मृतदेहाला रुग्णवाहिकेतून नेण्याऐवजी ई-रिक्षात टाकून शवागारात नेले. पोलिस मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ई-रिक्षात मृतदेह दिसत आहे. यादरम्यान, मृतदेहाचे पाय आणि डोक्याचा काही भाग रिक्षाच्या बाहेर लटकल्याचेही दिसत आहे. टीव्ही-9 हिंदीने याबाबत वृत्त दिले असून, व्हिडिओही शेअर केला आहे.
क्या हो रहा है राजस्थान में...मरने के बाद भी बदसलूकी! https://t.co/L8tNIG8ykJpic.twitter.com/dYk5ajxSPi
— Divyansh Rastogi (@DivyanshRJ) January 22, 2023
हे संपूर्ण प्रकरण जयपूरच्या महिला रुग्णालयाजवळील आहे. कडाक्याच्या थंडीमुळे एका तरुणाचा रस्त्यावर मृत्यू झाला होता. बेवारस मृतदेहाची माहिती मिळताच लालकोठी पोलिस ठाण्याचे पोलिस रविवारी सकाळी तेथे पोहोचले आणि मृतदेह ई-रिक्षात टाकून एसएमएस हॉस्पिटलच्या शवागारात नेला. नियमानुसार त्यांनी हा मृतदेह रुग्णवाहिकेतून न्यायला हवा होता.
थंडीमुळे तरुणाचा मृत्यू झाला
मीडिया रिपोर्टनुसार, लालकोठी पोलिस स्टेशनचे कर्तार सिंह यांनी माहिती दिली की, महिला हॉस्पिटलच्या बाहेर भूमिगत पार्किंगमध्ये एका तरुणाचा मृतदेह पडला होता. रविवारी सकाळी 9.45 च्या सुमारास मुलांना खेळत असताना मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. तरुणाचा मृत्यू थंडीमुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे. जनावरांनी मृताच्या तोंडावर ओरखडेही काढले होते, त्यामुळे तात्काळ मृतदेह तिथून हलवणे गरजेचे होते. यानंतर पोलिसांनी मृतदेह घेण्यासाठी ई-रिक्षा बोलावली. यानंतर मृताचे तोंड प्लास्टिकच्या पिशवीने बांधून मृतदेह ई-रिक्षाच्या फूटबोर्डवर टाकला. यावेळी मृतदेहाचे पाय व डोके ई-रिक्षातून बाहेर लटकले होते.