रायबरेली आणि वायनाड! राहुल गांधींना काँग्रेसने प्रचारासाठी दिले होते 'इतके' पैसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 15:00 IST2024-08-31T14:58:08+5:302024-08-31T15:00:32+5:30
Rahul Gandhi : निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना प्रचारासाठी निधी दिला जातो. काँग्रेसने उमेदवारांना दिलेल्या निधीबद्दल माहिती दिली असून, राहुल गांधींना दोन मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी किती पैसे दिले गेले, हे समोर आले आहे.

रायबरेली आणि वायनाड! राहुल गांधींना काँग्रेसने प्रचारासाठी दिले होते 'इतके' पैसे?
Rahul Gandhi News : लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारासाठी किती पैसे खर्च केले गेले, याबद्दल काँग्रेसने माहिती दिली आहे. काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणुकीचा खर्चाचा अहवाल सादर केला. यातून राहुल गांधींना दोन मतदारसंघांसाठी किती निवडणूक निधी दिला गेला, याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रायबरेली आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या राहुल गांधींना प्रचारासाठी प्रत्येकी 70 लाख रुपये दिले होते. काँग्रेसने इतर काही उमेदवारांनाही प्रचारासाठी निधी दिला.
प्रचारासाठी सर्वाधिक निधी कुणाला दिला?
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी सर्वाधिक निधी राहुल गांधी यांना नव्हे, तर दुसऱ्याच उमेदवाराला दिला होता. विक्रमादित्य सिंह असे त्यांचे नाव आहे. काँग्रेसने त्यांना प्रचारासाठी 87 लाख रुपयांचा निधी दिला होता.
विक्रमादित्य सिंह यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी त्यांचा पराभव केला होता.
प्रचारासाठी पक्षाकडून ७० लाख रुपयांचा निधी मिळालेल्या नेत्यांमध्ये किशोरी लाल शर्मा हेही आहेत. किशोरी लाल शर्मा यांनी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव केला.
कोणत्या नेत्यांना मिळाला ७० लाखांचा निधी?
केरळमधील अलपुझा लोकसभा मतदारसंघातून के.सी. वेणुगोपाल यांनी निवडणूक लढवली. त्यांना ७० लाखांचा निधी प्रचारासाठी दिला गेला होता. त्याबरोबर तामिळनाडूतील विरुधुनगरचे उमेदवार मणिकम टागोर, गुलबर्गाचे राधाकृष्ण आणि पंजाबमधील आनंदपूर साहिबचे उमेदवार विजय इंदर सिंगला यांनाही इतकाच निधी दिला गेला होता.