हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:00 IST2024-11-28T17:00:00+5:302024-11-28T17:00:54+5:30
Hemant Soren News: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रांचीमधील मोरहाबादी मैदानात झालेल्या या शपथविधीला इंडिया आघाडीचे बडे नेतेही उपस्थित होते. यावेळी राज्यपाल संतोष गंगवार यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकजुटीचं प्रदर्शन केलं. तसेच शपथ घेतल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्याचा विकास आणि जनतेच्या हितामध्ये काम करण्याचा संकल्पही सोडला.
हेमंत सोरेन झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे पुत्र आहेत. २००९ साली राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, २०१० मध्ये या पदाचा राजीनामा देऊन ते तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री बनले. २०१३ साली हेमंत सोरेन त्या राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २०१९ साली काँग्रेस, राजदच्या पाठिंब्यावर ते पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. यावर्षी इडीने अटक केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले.