Gold Smuggling: विगमध्ये लपवले 15 लाखांचे सोने, तस्करीची 'शक्कल' पाहून अधिकारी झाले अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:46 IST2022-04-05T14:37:32+5:302022-04-05T15:46:54+5:30
Gold Smuggling: उत्तर प्रदेशातील लखनौ विमानतळावर ही तस्करीची अनोखी घटना उघडीस आली आहे.

Gold Smuggling: विगमध्ये लपवले 15 लाखांचे सोने, तस्करीची 'शक्कल' पाहून अधिकारी झाले अवाक्
लखनौ: सोन्या-चांदीच्या वस्तू किंवा ड्रग्सची तस्करी करण्यासाठी तस्कर विविध युक्त्या लढवतात. पण, बहुतांशवेळा तस्कर त्यांच्या युक्त्यांमध्ये यशस्वी होत नाही. पोलिसांकडून अशा तस्करांच्या मुसक्या आवळल्या जातात. अशाच प्रकारची एक घटना लखनौ विमानतळावर घडली आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सोमवारी एका प्रवाशाकडून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 291 ग्रॅम सोने जप्त केले. आश्चर्याची बाब म्हणजे तस्कराने आपल्या डोक्यावरील खोट्या केसांमध्ये(विग) हे सोने लपवले होते.
विगमध्ये लपवले सोने
आयएएनएसच्या वृत्तानुसार, शारजाहून लखनौ विमानतळावर पोहोचलेल्या एका प्रवाशाला पकडण्यात आले. कस्टम अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, चेकींदरम्यान या प्रवाशाच्या संशयित हालचालींवरुन त्याला थांबवण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्याने विग घातल्याचे आढळले. त्याचा विग काढला असता, त्यात सोने लपवल्याचे आढळले.
A man trying to smuggle gold by concealing it under his wig was held by the Customs department at #Lucknow Airport on Monday.
— IANS (@ians_india) April 4, 2022
A senior Customs official said that the passenger was caught after he reached Lucknow Airport from Sharjah. pic.twitter.com/jfnp5bPiKi
सोन्याची किंमत 15 लाख रुपयांपेक्षा जास्त
विगमध्ये एका काळ्या पॉलिथिनमध्ये 291 ग्रॅम सोने ठेवले होते, ज्याची किंमत 15,42,300 रुपये आहे. जप्त केलेले सोने सीमाशुल्क कायद्याच्या कलम 110 अंतर्गत जप्त करण्यात आले आहे. कस्टम कायद्याच्या कलम 104 अंतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी प्रवाशाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.