सपाचा बालेकिल्ला सर करण्यासाठी भाजपाने दिला तगडा उमेदवार, आझमगडची पोटनिवडणूक होणार रंगतदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 15:07 IST2022-06-04T15:06:18+5:302022-06-04T15:07:01+5:30
Azamgarh Loksabha by-election: उत्तर प्रदेशमधील रामपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने घनश्याम लोधी यांना उमेदवारी यांना दिली आहे. तर समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आझमगड लोकसभा मतदारसंघातून भाजपाने अभिनेता दिनेशलाल यादव ‘निरहुआ’ यांना उमेदवारी दिली आहे.

सपाचा बालेकिल्ला सर करण्यासाठी भाजपाने दिला तगडा उमेदवार, आझमगडची पोटनिवडणूक होणार रंगतदार
नवी दिल्ली - पुढच्या काही दिवसांमध्ये देशातील काही राज्यातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणक होणार आहे. त्यासाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. उत्तर प्रदेशमधील रामपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने घनश्याम लोधी यांना उमेदवारी यांना दिली आहे. तर समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आझमगड लोकसभा मतदारसंघातून भाजपाने अभिनेता दिनेशलाल यादव ‘निरहुआ’ यांना उमेदवारी दिली आहे.
त्याशिवाय विविध राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांसाठीही भाजपाने उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात त्रिपुरामधील टाऊन बोरदोवली विधानसभा मतदारसंघात डॉ. माणिक शाह, आगताळा येथून डॉ. अशोक सिन्हा. सुरमा येथून स्वप्नदास पॉल, जुबराजनगर येथून मालिना देबनाथ यांना उमेदवारी दिली आहे. तर आंध्र प्रदेशमधील आत्मकूर विधानसभा मतदारसंघातून गुंदलपल्ली भरत कुमार यादव, दिल्लीतील राजिंदरनगर येथून राजेश भाटिया, झारखंडमधील मंदर विधानसबा मतदारसंघातून गंगोत्री कुंजूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील आझमगड लोकसभा मतदारसंघ अखिलेश यादव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाला आहे. तिथून समाजवादी पक्षाने सुशील आनंद यांना उमेदवारी दिली आहे. सुशील आनंद हे बामसेफचे संस्थापक सदस्य असलेल्या बलिहारी बाबू यांचे पुत्र आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, दिनेश लाल यादव गेल्या काही दिवसांपासून आझमगड जिल्ह्यात सातत्याने फिरून भाजपाचा प्रचार करत आहेत. मात्र तिकीट मिळेल, अशी आशा त्यांना नव्हती. पण अखेरीस येथून दिनेशलाल यादव यांच्या नावावरच भाजपाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आझमगड आणि रामपूर या दोन्ही मतदारसंघात सपाचा पाठीराखा वर्ग मोठ्या संख्येने असल्याने हे मतदारसंघ सपाचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात.