अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 18:53 IST2024-09-08T18:51:25+5:302024-09-08T18:53:15+5:30
उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं.

अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर
Prashant Kishore : लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात सर्वात मोठा फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून यश न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अपयशाचं खापर फोडलं जात होतं. पराभवानंतर त्यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अशातच निवडणूक रणनीतीकार आणि जन सूरज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशातील भाजपच्या पराभवावर भाष्य केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील वादाचा फटका निवडणुकीत बसला का असा सवाल विचारण्यात आला होता.
इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केलं. यावेळी प्रशांत किशोर यांना राजकीय घडामोडींवर अनेक टोकदार प्रश्न विचारण्यात आले. प्रशांत किशोर यांनी या प्रश्नांना त्यांच्या शैलीत उत्तर दिली आहेत. यावेळी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना विचारले की, उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा पराभव योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्यातील कथित मतभेदांमुळे झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं.
"मी याला वैयक्तिक शत्रुत्व म्हणून पाहत नाही. पण व्यापक दृष्टीकोनातून पाहिल्यास मी २००९ च्या लोकसभा निवडणुकीचे उदाहरण देऊ शकतो. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे राष्ट्रीय नेते होते. २००९ मध्ये गुजरातमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली नाही. पण मोदींच्या समर्थकांनी अडवाणींच्या प्रचाराला हानी पोहोचवली असे मी म्हणत नाही. अडवाणी जिंकले तर आमचे नेते मोदींना पंतप्रधान व्हायला अजून वेळ लागेल, असा संदेश पाठवला होता. कदाचित यावेळी उत्तर प्रदेशात हे घडले असावे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रचंड बहुमताने जिंकले तर योगी आपली जागा गमावतील, असे काहींना वाटत होते. त्यावेळी केजरीवाल यांनी योगीबद्दल जे बोलले ते योग्यच ठरले," असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.
"मी बिहारमध्ये फिरत होतो तेव्हा लोक विचारत होते. 'लोक विचारत होते की ४०० जागा आल्या तर योगींना हटवणार का? यावरून हा संदेश समर्थकांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. हा माझा विषय नाही आणि मी सहसा अशा विषयांवर बोलत नाही. मात्र योगींच्या समर्थकांमध्ये हा संदेश नक्कीच गेला आहे.," असेही प्रशांत किशोर म्हणाले.