शशी थरूरांच्या विरोधात केंद्रीय मंत्री मैदानात; भाजपाची खेळी, कसं आहे मतदारसंघातील गणित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 17:31 IST2024-03-09T17:27:41+5:302024-03-09T17:31:21+5:30
Shashi Tharoor to Contest From Thiruvananthapuram: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

शशी थरूरांच्या विरोधात केंद्रीय मंत्री मैदानात; भाजपाची खेळी, कसं आहे मतदारसंघातील गणित?
Thiruvananthapuram Lok Sabha Seat: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार शशी थरूर यांना पुन्हा एकदा केरळमधील तिरुवनंतपुरममधून तिकीट मिळाले आहे. शशी थरूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवार बनवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीने केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना उभे केले आहे. भाजपाने यापूर्वीच केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत तिरुवनंतपुरम जागेसाठीची लढत रंजक बनली आहे.
२ मार्च रोजी भाजपाच्या पहिल्या यादीत १९५ नावे जाहीर करण्यात आली होती. त्यात ३४ केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांची नावे होती. पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना तिरुवनंतपुरममधून तिकीट देण्यात आले आहे. २०१९ मध्ये माजी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शशी थरूर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार थरूर यांना ४,१६,१३१ मते मिळाली. थरूर यांना एकूण ४१.१५% लोकांची मते मिळाली. मागील वेळी भाजपा या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर होती. पक्षाचे उमेदवार कुम्मनम राजशेखरन यांना ३,१६,१४२ म्हणजेच ३१.२६% मते मिळाली. अशाप्रकारे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ९९,९८९ मतांनी विजय मिळवला.
थरूरांच्या विरोधात केंद्रीय मंत्री
मोदी सरकारमध्ये राजीव हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच जलशक्ती मंत्रालयात राज्यमंत्री आहेत. ते भाजपाचे राज्यसभा खासदार असून उद्योजक अशीही त्यांची ओळख आहे. राजीव हे एप्रिल २००६ पासून कर्नाटकमधून राज्यसभेचे सदस्य होते. एप्रिल २०१८ मध्ये ते भाजपाचे सदस्य म्हणून तिसऱ्यांदा सहा वर्षांच्या कालावधीसाठी कर्नाटकमधून राज्यसभेवर पुन्हा निवडून आले.
शशी थरूर सध्या तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते २०१९ मध्ये तिसऱ्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. त्यांनी यापूर्वी केंद्र सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. थरूर यांची संयुक्त राष्ट्रात जवळपास तीन दशकांची कारकीर्द होती. त्यामुळे ते खासदारकीचा चौकार मारणार का हे पाहण्याजोगे असेल.