Bangalore Schools Bomb: बंगळुरुतील 7 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी तात्काळ विद्यार्थ्यांना बाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:08 IST2022-04-08T15:08:08+5:302022-04-08T15:08:35+5:30
Bangalore Schools Bomb: या शाळांना ज्यावेळीस ईमेल मिळाले, तेव्हा काही शाळांमध्ये परीक्षा सुरू होत्या. सध्या पोलिस शाळांची तपासणी करत आहे.

Bangalore Schools Bomb: बंगळुरुतील 7 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी तात्काळ विद्यार्थ्यांना बाहेर काढले
बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील 7 शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास धमकीचा मेल आल्यानंतर शाळा प्रशासाने विद्यार्थ्यांना तात्काळ शाळांमधून बाहेर काढले. यानंतर बंगळुरू पोलिसांकडून शाळांची तपासणी केली जात आहे. तसेच, पोलिसांचे सायबर सेल विभाग तो ईमेल कुठून आला, याचा तपास करत आहे.
दोन शाळांमध्ये बॉम्ब सापडले नाहीत
बंगळुरू पूर्वचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. सुब्रमण्यस्वर राव यांनी सांगितले की, 'अशा प्रकारचे ईमेल बहुतेक वेळा खोटे असतात. पण, आम्ही त्यांची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आहे. आतापर्यंत दोन शाळांमध्ये तपास पूर्ण झाला असून, तिथे बॉम्ब सापडले नाहीत. मुलांना परत घेऊन जाण्यासाठी पालकांना बोलावण्यात आले आहे. काही शाळांमध्ये परीक्षा सुरू होत्या, मात्र परीक्षेत कोणताही गोंधळ झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मेलमध्ये काय लिहिले होते?
ज्या मेलद्वारे शाळांना धमकी देण्यात आली आहे, त्यात लिहिले- 'तुमच्या शाळेत खूप मोठा बॉम्ब ठेवण्यात आला आहे. लक्ष द्या, हा विनोद नाही. तुमच्यासह हजारो जीव धोक्यात येऊ शकतात. याची तात्काळ पोलिसांना तक्रार करा, उशीर करू नका. आता सर्वकाही फक्त तुमच्या हातात आहे.'
या 7 शाळांना धमकीचा ईमेल
बंगळुरुतील 1. दिल्ली पब्लिक स्कूल, वरथूर 2. गोपालन इंटरनॅशनल स्कूल, महादेवपुरा 3. न्यू अकादमी स्कूल, मराठाहल्ली 4. सेंट व्हिन्सेंट पॉल स्कूल, 5. इंडियन पब्लिक स्कूल, गोविंदपुरा 6. एबेनेझर इंटरनॅशनल स्कूल, इलेक्ट्रॉनिक सिटी या शाळांना धमकीचा ईमेल आला आहे.