घणदाट जंगलात उभ्या असलेल्या कारमध्ये घबाड सापडले; ५२ किलो सोने अन् एवढी कॅश की... मोजायला दोन दिवस लागले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 15:23 IST2024-12-20T15:19:56+5:302024-12-20T15:23:02+5:30
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छाप्यात ५२ किलो सोनं आणि ९.८६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.

घणदाट जंगलात उभ्या असलेल्या कारमध्ये घबाड सापडले; ५२ किलो सोने अन् एवढी कॅश की... मोजायला दोन दिवस लागले...
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या छाप्यात ५२ किलो सोने आणि ९.८६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जंगलात उभ्या असलेल्या कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम पाहून आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले आहेत.
महिला मंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह विधान; भाजप आमदार सी. टी. रवी यांना अटक
या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळजवळील मेंदोरीच्या जंगलात एका कारवर हा छापा टाकण्यात आला. यावेळी कारमधून मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम सापडली. भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई केली जात आहे. याबाबत आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा कारमधून एकूण ९.८६ कोटी रुपयांची रोकड सापडली आहे.
आयकर विभागाच्या या कारवाईत १०० हून अधिक पोलिसांचे पथक सहभागी झाले होते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या लोकायुक्त आणि आयकर विभागाच्या संयुक्त कारवाईचा हा छापा होता. यापूर्वी भोपाळ आणि इंदूरमधील एका मोठ्या बांधकाम कंपनीच्या ५१ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले होते.
छापेमारीत एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम पाहून आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेंदोरीच्या जंगलात जप्त केलेल्या कारमधून ५२ किलो सोन्याव्यतिरिक्त सुमारे ९ कोटी रुपयांची रोकड सापडली आहे, ही आयकर विभागाने ताब्यात घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात बांधकाम कंपनीवर करचोरी आणि इतर बेकायदेशीर काम केल्याचा आरोप आहे. विभागाने या संदर्भात तपास वाढवला असून संबंधित कागदपत्रे आणि पुराव्यांची चौकशी केली जात आहे. या छापेमारीनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. एवढी मोठी रोकड आणि सोने कोठून आले आणि ते कोणत्या कामासाठी वापरले जाणार होते, याचा शोध आता अधिकारी घेत आहेत.
याशिवाय भोपाळमधील माजी आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरावर आणि कार्यालयावर लोकायुक्तांनी छापा टाकला, यामध्ये २ कोटी ८५ लाख रुपये रोख आणि ६० किलो चांदीसह ५० लाख रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने सापडले.