नाशिकमध्ये पालकमंत्रिपदावरूनही वाद होण्याची शक्यता; भाजप टाकणार अनपेक्षित डाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 00:22 IST2024-12-25T00:21:52+5:302024-12-25T00:22:23+5:30
गिरीश महाजन यांना कुंभमेळ्याच्या तोंडावर गेल्यावेळेस प्रमाणेच कुंभमेळा मंत्री म्हणून पालकमंत्रिपद देण्याची अनपेक्षित खेळी भाजपाकडून खेळली जाण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये पालकमंत्रिपदावरूनही वाद होण्याची शक्यता; भाजप टाकणार अनपेक्षित डाव?
नाशिक : राज्याच्या मंत्रिमंडळातील सहभागी नाशिकच्या तिन्ही मंत्र्यांमध्ये पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. ज्याचे ज्या जिल्ह्यात जास्त आमदार तोच पालकमंत्री या निकषावर राष्ट्रवादीचे अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दावा सांगितला आहे, तर मंत्रिपदाच्या ज्येष्ठत्वामुळे आपल्याला मंत्रिपद मिळणार हे दादा भुसे यांनी जवळपास गृहीत धरले आहे. अर्थात असे असले तरी तुलनात्मकदृष्ट्या दुय्यम खाते मिळालेल्या भाजपाच्या गिरीश महाजन यांना कुंभमेळ्याच्या तोंडावर गेल्यावेळेस प्रमाणेच कुंभमेळा मंत्री म्हणून पालकमंत्रिपद देण्याची अनपेक्षित खेळी भाजपाकडून खेळली जाण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये दादा भुसे आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात सहभाग निश्चित मानला जात होता. मात्र, भुसेंना संधी मिळाली असली तरी छगन भुजबळ यांना टाळण्यात आल्याने त्यावरून वाद सुरू आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाशिक जिल्ह्यातून सात आमदार निवडून आले आहेत. त्यातील अॅड. माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांना कोणते खाते मिळणार यातील तिढा सुटला आहे. दादा भुसे यांना शालेय शिक्षणमंत्री आणि माणिकराव कोकाटे यांना कृषिमंत्रीपद तसेच नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध खाते देण्यात आले आहे. आता मंत्रिपदानंतर पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.
दादा भुसे हे सलग पाचवेळा निवडून आले असून कोकाटे यांच्या तुलनेत मंत्रिमंडळात ज्येष्ठ आहेत. आपल्या पालकमंत्रीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगून त्यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ज्या जिल्ह्यात जास्त आमदार तेथील पालकमंत्री त्या पक्षाचा असे ठरल्याचे सांगत राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील पालकमंत्रिपदावर दावा केल्याने तिढा वाढण्याची शक्यता आहे.