अजितदादा-भुजबळांमध्ये समेट होणार?; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 19:12 IST2024-12-22T19:10:30+5:302024-12-22T19:12:01+5:30
अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात निर्माण झालेली दरी कमी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अजितदादा-भुजबळांमध्ये समेट होणार?; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा खुलासा
NCP Hiraman Khoskar ( Marathi News ) : राज्य मंत्रिमंडळातून डावलल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर प्रचंड नाराज झाले असून ते जाहीरपणे अजित पवारांवर टीकास्त्र सोडत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला असून आम्ही लवकरच छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचं आमदार हिरामण खोसकर यांनी स्पष्ट केलं आहे.
"मी आणि मंत्री नरहरी झिरवळ हे छगन भुजबळसाहेबांची परवा भेट घेणार आहोत. याबाबत आम्ही अजितदादांशीही चर्चा केली आहे. या दोन नेत्यांनी पुन्हा एकत्र यावं, अशी आमची इच्छा आहे. भुजबळसाहेबांनी राज्यसभेचा विचार करावा आणि त्या माध्यमातून केंद्राचा निधीही नाशिक जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत," अशी माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीतील नेत्यांच्या मध्यस्थीनंतर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात निर्माण झालेली दरी कमी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
राष्ट्रवादीत घडलं राजकीय नाट्य
सर्वाधिक ७ आमदार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नाशिक जिल्ह्यातील दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांची निवड करताना सामाजिक समीकरणदेखील साधले. पक्षाचे दोन मराठा आमदार निवडून आले असले, तरी कोकाटे हे अनुभवी आणि आक्रमक नेते आहेत. सिन्नरचा त्यांनी केलेला विकास वाखाणण्यासारखा आहे. आदिवासी समाजातून तीन आमदार निवडून आले तरी झिरवाळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष म्हणून गेल्यावेळी चांगली कामगिरी बजावली आहे. आदिवासींच्या प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे सामाजिक समीकरण साधत असतानाच पक्षवाढ, जिल्ह्याचा विकास हे उद्दिष्टट्य समोर ठेवून या दोघांची निवड झाल्याचे दिसते. सर्वसमावेशक वृत्ती हा दोघांमधील समान धागा आहे. कोकाटे यांनी उद्धवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी जुळवून घेतले आहे, त्याचप्रमाणे झिरवाळ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श्रीराम शेटे यांच्याशी सलोख्याचे संबंध राखले.
मंत्रिमंडळात समावेश होत नसल्याचे लक्षात येताच भुजबळ यांनी विस्तार कार्यक्रम, हिवाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवत नाशिक गाठले. नाशिक, येवल्यात त्यांनी समर्थकांशी चर्चा केली आणि समता परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्षनेते अजित पवार यांच्यावर त्यांचा सर्वाधिक रोष दिसून आला. त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुकूल होते, असे म्हणत त्यांच्याशी व पर्यायाने भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काँग्रेसने त्यांना उघड आवतण धाडले. पण कळीचा मुद्दा म्हणजे, भुजबळ आता काय पवित्रा घेणार? ४१ आमदार निवडून आणून अजित पवार यांनी स्वतःचे वर्चस्व आणि अस्तित्व सिद्ध केल्यानंतर आता त्यांना आव्हान देणे भुजबळ यांना कितपत शक्य आहे, हा खरा मुद्दा आहे.