Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेत आता भाजपची 'पार्टी लाइन'च चालणार; गटनेतेपदासाठी पाच जणांची नावं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:17 IST2026-01-22T14:17:04+5:302026-01-22T14:17:47+5:30
Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता सत्तापदांच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच भाजपकडून वादग्रस्त आणि आयारामांना बाजूला ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेत आता भाजपची 'पार्टी लाइन'च चालणार; गटनेतेपदासाठी पाच जणांची नावं
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता सत्तापदांच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच भाजपकडून वादग्रस्त आणि आयारामांना बाजूला ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पक्षाची शिस्त, नियम पाळणाऱ्या म्हणजे पार्टीलाईनवर चालणाऱ्यांनाच पदे देण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पक्षाच्या गटनेतेपदासाठी पाच नगरसेवकांची नावेही पक्षाला कळविण्यात आली आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी (दि.२१) भाजपनेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात हजेरी लावली तसेच कोअर कमिटीची बैठकही घेतली. त्यात अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. आधी भाजपत अन्य पक्षांतून अनेक जण आले आहेत. त्यामुळे पक्षातील निष्ठावान विरुद्ध आयाराम असा संघर्षदेखील निर्माण झाला होता. गेल्या निवडणुकीत महत्त्वाची पदे अन्य पक्षांतून आलेल्या परंतु नगरसेवक म्हणून सिनीयर असणाऱ्यांना मिळाली होती. त्यातील काहीजण पुन्हा पक्ष सोडूनही गेले होते. त्यामुळे यंदा विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
भाजपच्या विचारांशी समरस झालेले बाहेरून आलेले आणि आणि पक्षाचे अन्य कार्यकर्ते सर्वच भाजपचे आहेत त्यामुळे पक्ष कोणताही भेदाभेद न करता निर्णय घेईल,
सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप
महाजन यांची बोडके यांच्या निवासस्थानी भेट
भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिंदेसेनेचे नगरसेवका कमलेश बोडके यांच्या निवासस्थानी भेट दिली. बोडके हे भाजपचे माजी नगरसेवक असून यंदा त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिंदे सेनेकडून निवडणूक लढविली होती.