Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:36 IST2026-01-13T16:35:58+5:302026-01-13T16:36:53+5:30
Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेचे २५ हून अधिक माजी नगरसेवक, कार्यकर्ते शिंदेसेनेत गेल्याने मनपा निवडणुकीत उद्धवसेनेचे प्रयत्न आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होत असून त्यांनी मनसेला सोबत घेतल्याने काहीसे बळ मिळाले आहे.

Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच
नाशिक : उद्धवसेनेचे २५ हून अधिक माजी नगरसेवक, कार्यकर्ते शिंदेसेनेत गेल्याने मनपा निवडणुकीत उद्धवसेनेचे प्रयत्न आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होत असून त्यांनी मनसेला सोबत घेतल्याने काहीसे बळ मिळाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याशी त्यांनी मैत्री कायम ठेवली आहे. मात्र जवळपास ११ ठिकाणी काँग्रेसने देखील उमेदवार दिल्याने उद्धव सेनेची कोंडी झाली तर उद्धवसेनेने देखील काही ठिकाणी उमेदवार दिल्याने आघाडीत बिघाडी निर्माण झाली. अखेरच्या क्षणी उद्धवसेनेने आपले उमेदवार ८२ ठिकाणी उभे केले आहेत.
प्रारंभी येथे उद्धवसेना व मनसेची युती निश्चित होती. परंतु नंतर राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेसने उद्धवसेनेसमोर सोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र उद्धवसेनेने अधिक जागा देण्यास दोघा पक्षांना नकार दिला. त्यामुळे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत कुठल्या जागा कोणासाठी यावरून चर्चा लांबली अन् बघता बघता तब्बल ८२ ठिकाणी पक्षाने एबी फॉर्म देऊन आपले उमेदवार निश्चित केले. त्यामुळे महाआघाडीत बिघाडी झाली. अन् उद्धवसेना अन् मनसे राष्ट्रवादी (शरद पवार) अन् काँग्रेससोबत केवळ नावापुरता सोबत राहिली आहे.
अखंड शिवसेना दुभंगल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यासह अनेक मावळे पक्ष सोडून शिंदेसेना व भाजपात दाखल झाले. त्यामुळे पक्षाला तडे गेले. त्यातव निवडणूक तोंडावर असताना माजी महापौर विनायक पांडे अन् नितीन भोसले यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळेच उरलेल्या निष्ठावान शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धवसेनेची या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई आहे. कधीकाळी नाशिक म्हणजे ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख राज्यभर होती. परंतु यंदाची निवडणूक पक्षासाठी आव्हानात्मक ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाले होते. यशाचा तोच आलेख कायम राखण्याचे आव्हान पक्षासमोर मनपा निवडणुकीत आहे.
मनसे वगळता दोघे मित्रपक्षांना ठेवले लांबच
नाशिकमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढत असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) यांना उद्धव व राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेपासून लांब ठेवण्यात आले. दोघा पक्षांचे नेते सभेला नव्हते. सभेत झेंडेदेखील मनसे, उद्धवसेनेचेच होते. सभेत ठाकरे बंधूंनी भाजपसह शिंदेसेनेवर टीकास्त्र सोडले. ही एकच सभा दोन पक्षांची झाली.