Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:43 IST2026-01-10T10:42:26+5:302026-01-10T10:43:29+5:30
Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपतील आयारामांमुळे पक्षातील निष्ठावंत विरुद्ध बाहेरून आलेले अशी अंतर्गत खदखद सुरू आहे.

Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपतील आयारामांमुळे पक्षातील निष्ठावंत विरुद्ध बाहेरून आलेले अशी अंतर्गत खदखद सुरू आहे. त्याचा लाभ उद्धवसेना आणि मनसेला व्हावा यासाठी ठाकरे बंधूनी नाशिकमधील पहिल्यावहिल्या संयुक्त सभेत निष्ठावंतांना चुचकारले.
आयुष्यभर पक्षाचे काम करणाऱ्यांना उमेदवारी न देता भाजपने अन्य पक्षातून आलेल्यांना दिलेल्या उमेदवारीचा मुद्दा उपस्थित केला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शुक्रवारी (दि. ९) झालेल्या या सभेत राज आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नाशिकच्या समस्या आणि भाजप सरकारकडून नाशिककरांच्या झालेल्या कथित फसवणुकीबाबत राजकारणावर टीका केली. यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपने आपल्या पक्षात स्थानिक नगरसेवक आणि उमेदवार असतानादेखील अन्य पक्षातील लोकं घेतली.
१९५२ म्हणजे जनसंघाच्या स्थापनेपासून आता २०२६ पर्यंतच्या कालावधीपर्यंत भाजपला बाहेरचे नेते आयात करावी लागत असतील काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी केला. दुसऱ्याच्या पोरांना आपल्या मांडीवर बसवायचे मग आपल्या पोरांनी काय करायचे, असा प्रश्न ठाकरे बंधूंनी केला.
एखाद्या प्रभागात दोन तीन सक्षम उमेदवार बाहेर करून आणले तर ठीक आहे. परंतु स्थानिक सक्षम असताना दुसऱ्यांना आपल्या पक्षात आणणे कितपत योग्य, असा प्रश्न ठाकरे बंधू यांनी केला. या सभेला मिलिंद नार्वेकर, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गीते, उपनेते दत्ता गायकवाड, जयंत टिळे, लालचंद सोनवणे, प्रथमेश गीते, मनसेचे सुदाम कोंबडे, सलीम शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निष्ठावंतांसाठी रडणाऱ्या फरांदेंविषयी सहानुभूती
उद्धवसेनेतील दोन माजी महापौरांना भाजपने पक्षात घेतल्यानंतर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे रडल्या, त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सहानुभूती दर्शवली. त्यांना आपण टोमणा मारत नाही. त्या निष्ठावंत आहेत आणि पक्षातील निष्ठावंतांसाठी भांडल्या. असे गौरवोद्गार काढले.
आता कुत्ता, बिल्ली, चुहा चालतो का?
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातून गेलेल्या माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भातही प्रश्न उपस्थित होते. ज्यांच्यावर सलीम कुत्ता बरोबर नाचल्याचा आरोप केला, त्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले. उमेदवारीसाठी भाजपला कुत्ता, बिल्ली, चुहा चालतो का, असा प्रश्न केला.
उद्धव ठाकरे म्हणाले...
तपोवनातील वृक्षतोडीचा घाट हे भाजपचे हिंदुत्व का?
आमचा वचननामा नव्हे हा तर ठाकरेंचा शब्द आहे. आम्ही शब्दाला जागतो.
भाजप हा केवळ उद्योजक अन् दलालांचा पक्ष बनला आहे.
सलीम कुत्ताशी संबंथाचा आरोप करतात अन् त्यांनाच भाजपत घेतात
तुमच्याकडे पैसा अन् आमच्याकडे मात्र निष्ठा, जनता ठरवेल कोणास निवडायचे
नाशिकसह राज्यात ड्रग्ज तस्करी, खराब रस्ते, गुन्हेगारांचे राज्य
आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्यानंतर पेढे वाटणारे आमचेच लोक भाजपत दुसऱ्या दिवशी प्रवेश करतात? ही तर राजकारणाची थट्टाच.
भाजपतील गणेश नाईक हेच आता शिंदेंना गद्दार म्हणू लागले आहेत. त्यामुळे आमचा आरोप खराच ठरला.
नाशिकची सत्ता द्या, मुंबई मनपाच्या माध्यमातून जी कामे केली तशी कामे करून दाखवू.
भाजपने ध्वजावरील हिरवा रंग काढावा आणि मग आमच्या टीका करावी.
राज ठाकरे म्हणाले...
१९५२ साली स्थापन झालेल्या पक्षाला २०२६ मध्ये बाहेरून लोक दत्तक घ्यावे लागतात
झाडे छाटण्याआधीच गिरीश महाजन पक्षातील कार्यकर्ते छाटत आहेत
२०१२ मध्ये मनसे सत्तेत असताना कुंभमेळा यशस्वीपणे पार पडला
त्या काळात एकही झाड कापले गेले नाही, मग आत्ता झाडतोड का?
कुंभमेळ्यानंतर साधू-संतांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आथीच ठरलेला असल्याचा आरोप
रतन टाटा यांच्या सहकार्याने बोटॅनिकल गार्डन उभारणी
७०० कोटींच्या कर्जात असलेली महापालिका कर्जमुक्त केल्याचा दावा
देवेंद्र फडणवीस यांनी 'नाशिक दत्तक घेतो' ही घोषणा करूनही एकही प्रकल्प पूर्ण केला नाही.
या प्रकल्पांमध्ये आयटी पार्क, रिंगरोड, द्वारका चौक ते नाशिकरोड उड्डाणपूल, टायरबेस मेट्रो आणि विविध प्रकारच्या उद्योगांच्या घोषणा अद्यापही अपूर्ण.
उद्धव यांचे २१ मिनिट भाषण; सात मिनिटे मुंबईचेच मुद्दे
उद्धव ठाकरे यांचे भाषण ८:२२ वाजता सुरू झाले अन् ८.४३ ला संपले. या २१ मिनिटांच्या भाषणात त्यांनी जवळपास साडेसहा ते सात मिनिटे मुंबईतील राजकारण अन् तेथे मनपाच्या माध्यमातून केलेली कामे यावरच भाष्य केले. त्यामुळे सभा नाशिकची साद मात्र मुंबईकरांना अशी चर्चा सभास्थळी सुरू होती. मुंबईतील कोस्टेल रोड, मनपा शाळा आदी कामांचा पाढा वाचला.
भाजपवर निशाणा साधताना राऊतांकडून नाशिक टार्गेट
खासदार संजय राऊत यांनी भाजप तसेच शिंदेसेनेवर टिका करताना एक प्रकारे नाशिकबाबत विसंगत दावे केले. नाशिकमध्ये पाच दिवसांनी पाणी येत असल्याचा दावा राऊत यांनी केला. मात्र नाशिकमध्ये अशी कुठेच परिस्थिती नसल्याची चर्चा त्यानिमित्ताने सभास्थळीच सुरु झाली. तर राज यांनी मनसेच्या काळात मुकणे धरणातून पाइपलाइन योजना राबवून आगामी ५० वर्ष कालावधीचा पाणीप्रश्न सोडविल्याचे सांगितल्याने राऊत यांचा हा दावा विसंगत आढळला.
नाशिकचा कुंभमेळा आराखडा २५ हजार कोटींचा असताना राऊत यांनी मात्र ५० हजार कोटींचे टेंडर गुजरातच्या ठेकेदारांना दिल्याचा दावा देखील अवास्तव ठरला. तपोवनातील १८०० झाडे तोडण्यावरून वादंग सुरू आहे. ते अद्याप तोडलेले नसतना तब्बल २० हजार झाडे तोडल्याचा अजब दावा राऊत यांनी भाषणात केला. त्यामुळे राऊत यांच्या दाव्याविषयी सभेनंतर नाशिकची अकारण बदनामी झाल्याची चर्चा रंगली.