Nashik Municipal Election 2026 : प्रचारासाठी ४५१ उमेदवारांनी केला १ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:29 IST2026-01-14T15:28:47+5:302026-01-14T15:29:46+5:30
Nashik Municipal Election 2026 : निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी होणाऱ्या खर्चाची दैनंदिन नोंद ठेवणे आवश्यक आहे.

Nashik Municipal Election 2026 : प्रचारासाठी ४५१ उमेदवारांनी केला १ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च
नाशिक : महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्यापासूनच उमेदवारांनी प्रचारासाठी खर्च करण्यास सुरुवात केली असून, त्याचा जमा खर्च सादर करण्यासाठी मात्र अद्यापही पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही. ७३५ उमेदवारांपैकी ४५१ उमेदवारांनी आपला खर्च महापालिकेचे खर्च निरीक्षक आणि मतदान अधिकाऱ्यांकडे सादर केला असून, दि. १२ जानेवारीपर्यंत १ कोटी ३५ लाख ४९ हजार ९३५ रुपयांचा खर्च नोंदविण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी होणाऱ्या खर्चाची दैनंदिन नोंद ठेवणे आवश्यक आहे. जाहिराती, सभा, मिरवणुका, बॅनर, पोस्टर, वाहन वापर, सोशल मीडियावरील प्रचार, तसेच कार्यकर्त्यावरील खर्च यांचा तपशील खर्च नोंदणीवहीत नमूद करणे बंधनकारक आहे. निवडणूक झाल्यानंतर तीस दिवसांच्या मुदतीत हा खर्च सादर करणे आवश्यक आहे. तो सादर न केल्यास उमेदवाराला सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाते.
उमेदवारांनी खर्च नोंदणी वही वेळोवेळी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी किंवा नेमून दिलेल्या खर्च निरीक्षकांसमोर तपासणीसाठी सादर करावी लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठराविक अंतिम मुदतीत खर्चाचा अंतिम अहवाल सादर करणे अनिवार्य असून, मुदत चुकल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास संबंधित उमेदवारावर कारवाई होऊ शकते.
खर्चाची मर्यादा ओलांडल्यास, खर्च लपविल्यास किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास उमेदवाराचे नामनिर्देशन रह होणे, दंड किंवा ठरावीक कालावधीसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई होऊ शकते. निकाल लागल्यानंतर तीस दिवसांत खर्च सादर करणे बंधनकारक आहे. जर खर्च सादर केला नाही तर पुढील निवडणुकीत उमेदवारीवर गंडांतर येते. त्यामुळे खर्च सादर करणे आवश्यक आहे.
बळवंत गायकवाड, खर्च निरीक्षक.
सर्वाधिक खर्च पांडे यांचा
४५१ उमेदवारांमध्ये सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार म्हणून शिवानी पांडे यांचा क्रमांक लागतो. त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार २ लाख २९ हजार ६०२ रुपये इतका खर्च झाला असून, सर्वांत कमी खर्च अपक्ष उमेदवार नूतन कोरडे (२०३०) यांचा झाला आहे.
टू व्होटर एपवर अल्प प्रतिसाद...
खर्च सादर करण्यासाठी टू व्होटर एपवर दैनंदिन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यावर खर्च नोंदणी करताना कागदपत्र अपलोड होत नाहीत, तसेच काही वेळेला नेटवर्क समस्या येत असल्याने त्यावर खर्च टाकता येत नसल्याचे उमेदवारांचा म्हणणे आहे. त्यामुळे अनेक उमेदवार दैनंदिन स्वरूपात निरीक्षकांकडे खर्च नोंदणी करीत आहेत.