Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:26 IST2025-12-28T14:24:24+5:302025-12-28T14:26:12+5:30
Nashik Municipal Corporation Election And Girish Mahajan : भाजपचे नेते महाजन रविवारी नाशिकमध्ये दाखल होत असून, ते उमेदवारी वाटपापर्यंत नाशिकमध्येच ठाण मांडणार आहेत.

Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
नाशिक : दोन दिवसांपूर्वीच झालेल्या प्रवेशाच्या नाराजीनाट्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या निर्णयावर महापालिका निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांच्यासह इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेत प्रवेश केलेल्यांच्या उमेदवारीबाबत फेरविचार करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. आता सर्व इच्छुक वेगवेगळ्या माध्यमांतून उमेदवारी निश्चितीसाठी लॉबिंग करणार आहेत.
दरम्यान, भाजपचे नेते महाजन रविवारी नाशिकमध्ये दाखल होत असून, ते उमेदवारी वाटपापर्यंत नाशिकमध्येच ठाण मांडणार आहेत. त्यामुळे सोमवारपर्यंत सर्व उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. २ दिवसांत भाजप उमेदवार निश्चित होणार आहेत. मात्र, आता यादी घोषित करण्यापेक्षा त्यांना सोमवारी किंवा मंगळवारी एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचे समजते.
भाजपकडून १४ डिसेंबरपासून मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा प्रभाग १३ मध्ये माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर यतीन वाघ, माजी स्थायी समिती सभापती शाहू खैरे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आले होते. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करीत राडाही केला होता. दरम्यान, या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी (दि. २६) मुंबईत कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीतही या विषयांची चर्चा झाली होती. आता पक्षाने सर्वेक्षणानुसार एक-दोन तीन क्रमाने विचार सुरू केला असताना काही नेत्यांनी सर्वेक्षणात नसलेली नावेही ऐनवेळी घुसवल्याचे कळते.
महाजन हेच अंतिम निर्णय घेणार
शहरातील तिन्ही आमदारांना विश्वासात घेण्यात येणार असले तरी सध्या उमेदवारीवरून वेगवेगळ्या दावे प्रतिदावे केले जात आहे. राजकीय नेते आणि इच्छुक वेगवेगळ्या मार्गानी प्रयत्न करीत असले तरी अंतिम निर्णय पक्षाचे नेते गिरीश महाजन हेच घेणार असल्याचे कळते. निवडणूक प्रभारी म्हणून त्यांना या संदर्भात अधिकार देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
प्रभाग क्रमांक १३ मधील निर्णय होल्डवर
प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन माजी महापौर आणि एक स्थायी समितीचे माजी सभापती तसेच एका माजी आमदार अशा मान्यवरांना प्रवेश देण्यात आल्याने भाजपमध्ये वातावरण पेटले होते; परंतु हा निर्णय होल्डवर सोडल्याचे सांगण्यात आले. रात्री तर अनेकांची तिकीटही कापल्याची चर्चा होती.
निर्धार पक्का, नेत्यांचा युतीवर शिक्का!
महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या एकला चलो रे ची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आता शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र येण्यावर शनिवारी अखेर शिक्कामोर्तब झाले. आता जागा वाटपावर चर्चा सुरू असून मध्यरात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. भाजपाच्या वतीने सुरुवातीपासून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात असले तरी दुसरीकडे शंभर प्लसचा नारादेखील लावला होता. त्यामुळे मित्र पक्षांमध्ये महायुतीबाबत शंका होतीच. तरीही चर्चेच्या दोन तीन फेऱ्यानंतर भाजपाने मित्र पक्षांना युती होणार किंवा नाही हे ही कळवले नाही. अखेरीस गेल्या तीन दिवसांपासून शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात सुरु होत्या. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. आता तर त्यावर स्थानिक पातळीवर शिक्कामोर्तब झाले.
शनिवारी (दि. २७) गोविंद नगर येथील एका हॉटेलमध्ये दुपारी बैठक झाली. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, शिंदेसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे, विजय करंजकर, अजय बोरस्ते उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षांचे एकत्रीत निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर रात्री पुन्हा जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. शिंदेसेनेने भाजपकडे ४५ जागांची मागणी केली असताना भाजप केवळ २५ जागांवर तयार होती. भाजप स्वतः ८५ ते १० जागा लढवण्यावर ठाम आहे. राष्ट्रवादीला केवळ १० जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित जागांचे गणित न बसल्याने युतीची शक्यता धूसर झाली आहे.