Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:39 IST2025-12-26T12:37:23+5:302025-12-26T12:39:16+5:30
Nashik Municipal Corporation Election And Girish Mahajan : उद्धवसेनेत असलेले दोन माजी महापौर, काँग्रेसचे स्थायी समितीचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी (शरद पवार) माजी आमदार यांना भाजपात प्रवेशासाठी पायघड्या अंथरल्याने गुरुवारी पक्षातील असंतोष उफाळून आला.

Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
नाशिक : उद्धवसेनेत असलेले दोन माजी महापौर, काँग्रेसचे स्थायी समितीचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी (शरद पवार) माजी आमदार यांना भाजपात प्रवेशासाठी पायघड्या अंथरल्याने गुरुवारी पक्षातील असंतोष उफाळून आला. विशेष म्हणजे महापालिका निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यादेखील या प्रवेशाबाबत अंधारात असल्याने त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्यावर अघोषित बहिष्कार टाकला. तर त्यांच्या समर्थकांनी तसेच अन्य निष्ठावान कार्यकर्त्यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाबाहेर जोरदार निषेध दर्शवला. पक्षाचे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी घेरावही घातल्याने मोठ्या मुश्कीलीने त्यांना व्यासपीठावर पोहोचण्याचा मार्ग काढावा लागला.
माजी आमदार नितीन भोसले राष्ट्रवादी (शरद पवार), शाहू खैरे (काँग्रेस), माजी महापौर विनायक पांडे (उद्धवसेना), माजी महापौर यतीन वाघ (उद्धवसेना), दिनकर पाटील (मनसे) यांना पक्षात घेताना भाजपतच नाराजी उफाळून आली. त्यात शाहू खैरे, विनायक पांडे, यतीन वाघ यांच्या प्रवेशाला विरोधाची धार अधिकच दिसून आली. ते आणि त्यांचे वारसदार प्रभाग १३ मधून इच्छुक आहेत. त्यामुळे तेथील निष्ठावंतानी संताप व्यक्त केला.
निष्ठावंतांवरच अन्याय का?
गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून भाजप कार्यालयात पक्षाला विरोध करणारा नाराज गट एकत्र झाला होता. निष्ठावंतांना डावलून आयारामांना पक्षाची उमेदवारी देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप नाराज गटाने केला. शाहू खैरे यांच्या विरोधात गेल्या वेळी निवडणूक लढून पराभूत झालेले भाजपचे गणेश मोरे व त्यांचे मोठ्या संख्येने जमलेले समर्थक पक्ष प्रवेशाला विरोध करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करीत होते. आम्ही हा प्रवेशसोहळा उधळून लावू, मंत्री महाजन व आमदार फरांदे यांनी येथे येऊन आमच्याशी चर्चा करावी, असे म्हणत नाराज गटाने पक्ष प्रवेशद्वारावरच कडे तयार केले.
विरोधानंतरही प्रवेशावर शिक्कामोर्तब
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी पाहता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात करण्यात आला. उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात भारतीय जनता पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून आली. बाहेरच्यांना पक्षात आणून त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊन पक्षातील निष्ठावंतांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. प्रचंड विरोधानंतरही भाजपने नाराजांना डावलून पाच प्रमुख नेत्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला.
हॉटेल अन् पक्ष कार्यालयात एकाचवेळी 'ड्रामा'
- या पक्ष प्रवेशावरून नाराज असलेल्या भाजपच्या निवडणूक प्रमुख तथा आमदार देवयानी फरांदे प्रचंड नाराज झाल्या.
- आमदार फरांदे यांनी सकाळी ११ वाजता मंत्री महाजन थांबून असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेत खैरे, पांडे यांच्या पक्ष प्रवेशाला उघड विरोध केला.
- नाराज गटदेखील हॉटेलबाहेर थांबून होता. यावेळी आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे महाजन यांच्यासोबत होते.
- बराच वेळ या विषयावरून खल सुरू असताना तिकडे भाजप कार्यालयात पक्ष प्रवेशाला विरोध करण्यासाठी जोरदार राडा सुरू होता.
- मुख्य सोहळ्यास देवयानी फरांदे यांनी उपस्थित न राहता बहिष्कारच टाकला. मात्र, नंतर त्यांनी पक्षात प्रवेश करणऱ्यांचे स्वागत केले. आपण पक्षातील निष्ठावंतासाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले.