नाशिकच्या महापौरपदासाठी हिमगौरी आडके, उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांचे नाव निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 15:17 IST2026-02-03T15:15:32+5:302026-02-03T15:17:58+5:30
सकाळी भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.

नाशिकच्या महापौरपदासाठी हिमगौरी आडके, उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांचे नाव निश्चित
नाशिक- महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांची उमेदवारी निश्चीत करण्यात आल्याची घोषणा भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. आज सकाळी भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.
महापौर आणि उपमहापौरपदासाठी एकूण चार नावे प्रदेश भाजपकडे पाठवण्यात आली होती. त्यापैकी हिमगाैरी आडके आणि मच्छींद्र सानप यांचे नाव निश्चीत करण्यात आले आहेत. हिमगौरी आहेर सलग दोन वेळा निवडून आल्या असून स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापतीपदाचा मान त्यांनी मिळवला होता. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या त्या पुतणी आहेत.
मच्छींद्र सानप हे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब सानप यांनीही महापालिकेत उपमहापौरपद भूषवले आहे. आगामी काळात कुंभमेळा आणि प्रशासन चालवण्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने आज उपमहापौरपदासाठी विलास शिंदे, राहुल दिवे आणि प्रविण तिदमे यांनी अर्ज दाखल केला आहे.