Chhagan Bhujbal: निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार; भुजबळांचा महायुतीला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 14:54 IST2024-12-18T14:53:40+5:302024-12-18T14:54:55+5:30
समर्थकांच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.

Chhagan Bhujbal: निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार; भुजबळांचा महायुतीला इशारा
NCP Chhagan Bhujbal ( Marathi News ) : राज्य मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ हे आक्रमक झाले असून आज समर्थकांच्या मेळाव्यात भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. "विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीसोबत ओबीसी समाजाने भरभरून मतदान दिल्यामुळे हे सरकार आलं. मात्र आता आपल्याबाबत वेगळा विचार केला जात आहे. परंतु अजून निवडणुका संपलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत," असं म्हणत छगन भुजबळ यांनी महायुतीला सूचक इशारा दिला आहे.
"मंत्रिपदापेक्षा जी अवहेलना झाली, ती जास्त मनाला डाचत आहे. मला राज्यभरातून फोन येत आहेत. मी सगळीकडे जाणार आहे, मी देशभरातही जाणार आहे आणि पुन्हा एकदा ओबीसींचा एल्गार आपण तयार करू," असं म्हणत छगन भुजबळ यांनी दंड थोपटले आहेत.
दरम्यान, आजच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांचे मुख्य लक्ष्य हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असतानाही आपल्याला डावलण्यात आलं, असं म्हणत नाव न घेता भुजबळ यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.