निफाडमध्ये दिलीप बनकरांकडून कदम यांच्या हॅट्ट्रिकला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:20 AM2019-10-25T00:20:55+5:302019-10-25T00:29:15+5:30

निफाड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी विद्यमान आमदार अनिल कदम यांना 17668 मतांच्या फरकाने पराभूत करुन कदम यांना विजयाची हॅट्ट्रीक करण्यापासून वंचित ठेवण्यात यश मिळविले.

 Break in Kadam's hat-trick from Dilip Bunker in Niphad | निफाडमध्ये दिलीप बनकरांकडून कदम यांच्या हॅट्ट्रिकला ब्रेक

निफाडमध्ये दिलीप बनकरांकडून कदम यांच्या हॅट्ट्रिकला ब्रेक

googlenewsNext

ओझर : निफाड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी विद्यमान आमदार अनिल कदम यांना 17668 मतांच्या फरकाने पराभूत करुन कदम यांना विजयाची हॅट्ट्रीक करण्यापासून वंचित ठेवण्यात यश मिळविले.
कदम यांनी गेल्या दहा वर्षात जिल्हाभर वेगळी ओळख निर्माण केली होती. यंदा मात्र राष्टÑवादीच्या तिकीटावर पाचव्यांदा निवडणुक लढविणारे दिलीप बनकर यांनी मागच्या चुका सुधारत व राजकीय अनुभवातून अंतर्गत व्यूहरचना आखत निफाड मतदारसंघातून दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. बनकर यांना 96354 तर अनिल कदम यांना 78668 मते मिळाली. ओझर गट वगळता इतर सहा गटात कदम यांनी केलेल्या गणितानुसार आकडे जुळले नाहीत. सुरुवातीच्या सात फेऱ्यांमध्ये बनकर यांनी मिळवलेली आघाडी ओझरकडून तुटेल अशी अपेक्षा असताना अपक्ष यतीन कदम यांनी घेतलेली 24046 मते कदम यांच्या दृष्टीने मोठी अडचणीची ठरली. त्यामुळे रणसंग्रामात चतुर असलेल्या कदम यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. दुसरीकडे विविध संस्था ताब्यात असल्याने बनकर यांना त्याची मोठी साथ मिळाली. त्यामुळे कदम यांनी जी राजकीय गणिते मांडली गेली होती, ती सर्वच फोल ठरली.
गोदाकाठ भागात राष्ट्रवादीकडे एकही प्रभावी नेता नसताना बनकर यांनी दिलेली काट्याची लढत चर्चेची मानली जात आहे. ओझरपाठोपाठ सेनेचा बालेकिल्ला असलेल्या सुकेणे गटात राष्ट्रवादीने मिळविलेली आघाडी अभ्यासाचा विषय ठरून गेली आहे. विरोधकांना अंधारात ठेऊन बनकरांचे होम ग्राउंड असलेल्या पिंपळगावमध्ये त्यांनी कमी गर्दीत काढलेली रॅली राजकीय परिपक्वतेचे लक्षण मानले जात आहे. शिवसेना, अपक्ष व इतरांकडून बनकर यांच्या कार्यपद्धतीवर केलेल्या टीकेला त्यांनी वैयक्तिकरित्या उत्तरे देणे टाळले हेसुद्धा तालुकावासियांना भावल्याचे बोलले जात आहे.
भाजप-शिवसेनेची महायुती असतानादेखील भाजपचे दोन-तीन अपवाद वगळता आखडता घेतलेला हातही कदम यांच्या पराभवास काहीअंशी कारणीभूत ठरल्याच्या प्रतिक्रिया निकालानंतर राजकीय जाणकारात व्यक्त झाल्या.
आज तालुक्यातील राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे अनेक नेते भाजप- सेनेमध्ये आहेत तर मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी हजारोंच्या संख्येने केलेली सदस्य नोंदणी नेमकी किती मतांमध्ये रूपांतरित झाली हा देखील अभ्यासाचा मुद्दा आहे. मतमोजणीत पहिल्या फेरीपासून चुरस दिसून येत होती. बनकर यांनी जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर मताधिक्य घेतल्याने ते तोडणे कदम यांना अखेरपर्यंत शक्य झाले नाही. आदित्य ठाकरे यांनी कदम यांना मंत्रीपद देण्याचा जाहीर शब्द दिला होता. पण त्यांचाही उपयोग झाला नाही. एकूणच सर्व घडामोडी पाहता दोघांच्या भांडणात तिसºयाचा लाभ असाच निकाल निफाड मतदारसंघाने पहिल्यांदा अनुभवला. त्यामुळे राजकीय गणितात निफाडच्या मतदारांचे हात कुणीही धरू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे.
विजयाची तीन कारणे...
1शरद पवार यांची पिंपळगावी झालेली सभेचा परिणाम तसेच त्यांच्या झंझावाती सभांमुळे जनतेत वाटणारी सहानुभूती, एचएएलचा मुद्दा व शेतकºयांची झालेली एकजूट हा महत्त्वाचा वळणबिंदू.
2दोन ते तीन नेते वगळता भाजपने सुरुवातीपासून घेतलेली मवाळ भूमिका राष्टÑवादीच्या पत्थ्यावर पडली.
3विरोधी गोटातील शिलेदार टिकेच्या माध्यमातून लक्ष्य करीत असताना बनकर यांच्या गटाने घेतलेली समजूतदारीची भूमिका.
महामार्गावरील गावे यातच दोन्ही प्रमुख उमेदवारांची चुरस होती. त्यातही खुद्द ओझर गावात कदम कुटुंबियातीलच दोन उमेदवार असल्याने मते विभागणी घडून आली. गंगाथडीच्या परिसरात अनिल कदम व दिलीप बनकर या दोघांनी बºयापैकी प्रचारावर लक्ष केंद्रीत केले होते. परंतु बनकर यांना शरद पवार यांचा करिष्मा अंतिम चरणात यशापर्यंत घेऊन गेला.
कदमांच्या पराभवाचे कारण...
यंदा वाढलेला मतांचा टक्का, कांदा निर्यात बंदी मुळे नाराजी, उद्धव ठाकरे यांनी यावेळी निफाडमध्ये एकही सभा घेतली नाही, तसेच चुलत बंधू यतीन कदम यांच्या उमेदवारीमुळे कदम यांच्या मतांची झालेली विभागणी.
पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते
१ अनिल कदम शिवसेना 78668
२ यतीन कदम ब.वि. आ. 24046
३ उत्तम निरभवणे बसपा 808
४ संतोष आहेरराव वंचित ब. आ. 2667
५ सय्यद लियाकत अपक्ष 480

Web Title:  Break in Kadam's hat-trick from Dilip Bunker in Niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.