"शरद पवारांना सोडून गेलेल्यांना परत घ्यायये नाही" : अनिल देशमुख
By कमलेश वानखेडे | Updated: June 8, 2024 18:15 IST2024-06-08T18:13:43+5:302024-06-08T18:15:39+5:30
Nagpur : अजित पवार गटातील आमदार संपर्कात

"Those who left Sharad Pawar should not be taken back" : Anil Deshmukh
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना जे सोडून गेले ते चलबिचल झाले आहेत. वर्षभरापूर्वी त्याचा निर्णय चुकला. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटातील आमदार संपर्कात आहेत. चार महिन्यांनी निवडणूक असल्याने त्यांना चिंतेने ग्रासले आहे. शरद पवारांना जे कठीण काळात सोडून गेले त्यांना परत घ्यायचे नाही असे ठरले आहे, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. शनिवारी पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, ज्यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली, ते आमच्या डोक्यात आहे. जयंत पाटील यांना अनेक आमदार फोन करत आहेत. शरद पवार बाहेर जाऊ नये म्हणून बारामतीत अडकवले. सुनेत्रा पवार यांना तिकीट दिली, ते सर्वत्र फिरले, महाराष्ट्रात ६० सभा शरद पवार यांनी घेतल्या. म्हणून कोल्हापूरला त्यांचे बॅनर लागले असतील, असेही देशमुख म्हणाले.
जागा वाटप वरिष्ठ पातळीवर
जेमतेम लोकसभा निवडणूक झाल्या आहेत. जागा वाटप बाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा होईल. कोण कुठे लढेल यावर सध्या चर्चा नाही. दावा कुणीपण करू शकतो. आम्ही पण दावा करू. पण चर्चा करून निर्णय होईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे यांनी आता तरी जमिनीवर यावे
कृपाल तुमाने हे युतीचे १० वर्ष खासदार होते. त्यांनी नाराजी व्यक्त केली. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. काँग्रेस आमदाराला तिकीट दिले पण निवडून आणू शकले नाही. आम्ही आमची जागा जिंकून दाखवली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता तरी जमिनीवर यावे. त्यांच्या कामटी मतदारसंघात १८ हजाराने काँग्रेसचा उमेदवार पुढे आहे. बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कायम राहिले पाहिजे, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री राहिले पाहिजे याचा आम्हाला फायदा होईल, असा चिमटाही देशमुख यांनी काढला.