नागपुरात भाजप-शिंदेसेनेची युती, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:11 IST2025-12-30T17:09:46+5:302025-12-30T17:11:28+5:30
शिंदेसेनेला ८ जागा : गडकरींच्या निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत मॅरेथॉन बैठक

BJP-Shinde Sena alliance in Nagpur, Ajit Pawar's Nationalist Party on its own
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिका निवडणुकांसाठी मंगळवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. मात्र, नागपुरात महायुतीचे जागावाटपाचे घोंगडे भिजतच पडल्याने विविध कयास वर्तविण्यात येत होते. सोमवारी मध्यरात्री अखेर ही कोंडी दूर झाली आणि नागपुरात शिंदेसेनेला ८ जागा देण्याचे निश्चित झाले.
भाजप व शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मॅरेथॉन बैठक झाली व त्यात हा फॉर्म्युला ठरविण्यात आला. दरम्यान, भाजपकडून युतीबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) ने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीने सोमवारी रात्री सुमारे ४० उमेदवारांना 'एबी' फॉर्म वितरित केले. इकडे सोमवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भाजप व शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात भाजपकडून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, संजय भेंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर शिंदेसेनेकडून राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आ. कृपाल तुमाने, पूर्व विदर्भ प्रमुख किरण पांडव, सूरज गोजे हे उपस्थित होते. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली व मध्यरात्रीनंतर अखेर तोडगा काढण्यात आला. १५१ पैकी शिंदेसेनेला ८ जागा सोडण्याचे निश्चित करण्यात आले. यासोबतच कोणत्या जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार लढतील हेही निश्चित करण्यात आले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याला दुजोरा दिला. शिंदेसेनेसोबत सकारात्मक चर्चा झाली. युतीला ५१ टक्के मते मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. शिंदेसेनेला ८ जागा देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदेसेनेकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत कमीत कमी ५० ते ६० जागा मागितल्या होत्या. त्यामुळे बैठकीतील भाजप पदाधिकाऱ्यांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला होता. खुद्द भाजपकडूनच अठराशेहून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या होत्या, भाजपने सोमवारी रात्रीपर्यंत शंभराहून अधिक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटपदेखील केले. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतदेखील रविवारी शहरातील नेत्यांची चर्चा झाली होती. मात्र, घटक पक्षांना नेमक्या किती जागा द्यायच्या याबाबत भाजपकडून मौन राखण्यात आले होते.
ज्या जागेवर विजय निश्चित वाटत असेल तेथे आपलेच उमेदवार उभे करायचे. घटक पक्षांसाठी जागा सोडत असताना तेथे ते सक्षम आहेत की नाही, याचीदेखील खातरजमा करून घेण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. 'जिंकण्यासाठीच जागा' या सूत्रानुसार जागावाटप करण्याची भाजपची भूमिका आहे. ज्या जागांवर शिवसेनेचा विजय झाला होता तितक्या जागा देण्यात येतीलच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी जागा वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आम्ही सूत्र निश्चित करत आहोत, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे शिंदेसेनेला दोन आकडी जागा तरी मिळतील का हा सवाल होता.
गडकरींना करावी लागली मध्यस्थी
शिंदेसेनेकडून कमीत कमी १५ जागांचा आग्रह धरण्यात आला. मात्र, भाजपकडून ५ च्या वर जागा देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. त्यामुळे शिंदेसेनेचे पदाधिकारी नाराज झाले होते. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मध्यस्थी करावी लागली. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही दूरध्वनीवर याबाबत चर्चा झाली.
बावनकुळेंना घेरले, गडकरींकडे रांगा
उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपच्या डॉ. कमला मोहता यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर संताप व्यक्त केला. त्यांनी रामदासपेठ परिसरातून तिकिटाची मागणी केली होती. तरी त्यांना तिकीट मिळाले नाही. नाराज कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर पोहोचले. तेथे बावनकुळे यांची काही इच्छुकांनी गाडी अडविली व त्यांना घेराव घालत सवाल उपस्थित केले. बाहेरील व्यक्तींना संधी का देण्यात आली, असा सवाल करण्यात आला. बावनकुळे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवू असे सांगितले. दुसरीकडे भाजपचे तरुण पदाधिकारी देवदत्त डेहनकर यांना तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी पक्षाच्या सर्व पांचा राजीनामा दिला. मागील काही वर्षांपासून ते भाजयुमो व पक्षाच्या माध्यमातून सक्रिय होते.