Sanjay narvekar 25th art for viewers | संजय नार्वेकरचे पंचविसावी कलाकृती लवकरच रसिकांच्या भेटीला
संजय नार्वेकरचे पंचविसावी कलाकृती लवकरच रसिकांच्या भेटीला

ठळक मुद्देवरवरच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य महत्त्वाचं ते जपा’ असा संदेश देणारं हे नाटक आहे या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत प्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकर

मराठी रंगभूमीवर वेगवेगळे नाट्यप्रयोग सातत्याने होत असतात. ‘आपल्याकडे जे चांगलं आहे, त्यापेक्षा दुसऱ्यांकडे काय आहे ते जाणून घेण्यासाठी व जे नाही ते मिळवण्यासाठी माणूस नेहमीच धावत असतो.’ याच मनोवृत्तीवर अत्यंत मार्मिक भाष्य करणारे ‘होते कुरूप वेडे’ हे धमाल विनोदी नाटक लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे  रंगभूमीवर घेऊन आले आहेत.

‘वरवरच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य महत्त्वाचं ते जपा’ असा संदेश देणारं हे नाटक आहे. या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत प्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकर. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती सार्थ करणारे अभिनेता ‘संजय नार्वेकर’ या नाटकाद्वारे रसिकप्रेक्षकांना हास्याची मेजवानी देण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे या नाटकाद्वारे संजय नार्वेकर ‘पंचविशीत’ पदार्पण करतायेत. अंहं...दचकू नका !! ‘पंचविशीत’ म्हणजे ‘होते कुरूप वेडे’ हे त्यांचं रंगभूमीवरचं पंचविसावं नाटक आहे. या सोबत आणखी एक सुरेख योगायोग म्हणजे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचेही हे पंचविसावं नाटक आहे.

‘संजय आणि मी अनेक वर्ष एकत्र काम करत असून ‘होते कुरूप वेडे’ च्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करतोय. इतक्या वर्षांचा दोघांचा हा अनुभव या नाटकाला नक्कीच वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल’ असा विश्वास राजेश देशपांडे यांनी व्यक्त केला. तर ‘राजेश सारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची एक चिरंतन प्रक्रिया असते, या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजेश सोबत काम करायला मिळाले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे’. अशा भावना अभिनेता संजय नार्वेकर यांनी व्यक्त केल्या. संजय नार्वेकरांसोबतच नयन जाधव, भारत सावले, शलाका पवार, नितीन जाधव, मिनाक्षी जोशी, कल्पेश बाविस्कर हे कलाकार नाटकात भूमिका साकारणार आहेत.  

डिएसपी एन्टरटन्मेंट प्रा.लि. निर्मित ‘होते कुरूप वेडे’ या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, गीतकार राजेश देशपांडे असून निर्माते दादासाहेब पोते आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत आमीर हडकर यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. मंगेश नगरे हे नाटकाचे कार्यकारी निर्माते आहेत. ‘होते कुरूप वेडे’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच झाला.
 


Web Title: Sanjay narvekar 25th art for viewers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.