sanjay jadhav lucky movie release on 7th february | कॉलेज विश्वावर भाष्य करणार संजय जाधव यांचा ‘लकी’ प्रेक्षकांच्या भेटीला
कॉलेज विश्वावर भाष्य करणार संजय जाधव यांचा ‘लकी’ प्रेक्षकांच्या भेटीला

ठळक मुद्दे एक कॉलेजविश्वावरचा ‘लकी’ हा चित्रपट घेऊन आले आहेत‘लकी कपल’ची ही खूप फॅनफॉलोविंग आहे

कॉलेजविश्व, त्यातली फ्रेंडशीप आणि कॉलेजमधली लव्हस्टोरी ह्यावर अनेक सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीत येऊन गेले. पण ‘दुनियादारी’ हा चित्रपट सर्वाधिक गाजला. संजय जाधव ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या दुनियादारी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली  आणि आज ही फिल्म आइकॉनिक म्हणून गणली जाते.

आता ही आइकॉनिक फिल्म बनवणारे संजय जाधव अजून एक कॉलेजविश्वावरचा ‘लकी’ हा चित्रपट घेऊन आले आहेत. 7 फेब्रुवारीला सिनेमागृहांमध्ये झळकलेल्या ह्या सिनेमाला सध्या कॉलेज तरूणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2013मध्ये रिलीज झालेल्या दुनियादारीच्या घवघवीत यशामुळेच लकी सिनेमा घेऊन यावासा वाटला का असे विचारल्यावर संजय जाधव म्हणतात, “सुहास शिरवळकरांनी लिहीलेल्या दुनियादारी ह्या पुस्तकाची मी कॉलेजमध्ये असल्यापासून पारायणं केली आहेत. फिल्म बनवण्याअगोदर ते पुस्तक मी किमान पाचशेवेळा वाचले होते. पण लकीची कथा तशी घडली नाही. लकीचे लेखक अरविंद जगताप ह्यांच्याशी आजच्या मुलांचे भावविश्व ह्याविषयी चर्चा करताना हा विषय सुचला. माझी मुलगीही आता कॉलेजमध्ये जाते. त्यामुळे आजच्या कॉलेजमधल्या मुलांविषयीची फिल्म बनवावी असे वाटले.”

दुनियादारीत कॉलेजविश्व दाखवलं होतं. तसेच लकीमध्येही दाखवण्यात आलंय. पण ह्याशिवाय ह्या दोन्ही सिनेमांमध्ये खरं तर काही साम्य नाही. ह्यासंदर्भात संजय जाधव म्हणतात, “हो, कारण ह्या दोन्ही फिल्म वेगवेगळ्या पिढीच्या आहेत. दुनियादारी ही सत्तरच्या दशकातली कॉलेजची प्रेमकहाणी होती. तर लकी हा सिनेमा 2019चा आहे. आज कॉलेजची मुलं एकमेकांशी ज्याप्रकारे संवाद साधतात. जसे शब्दप्रयोग वापरतात. तशीच भाषाशैली ठेवण्यात आलीय. प्रेम व्यक्त करण्याच्या पध्दतीही गेल्या 30-35 वर्षात बदलल्यात. तेव्हाच्या लव्हस्टोरीज पत्र आणि फोनमुळे फुलल्या. तर आज डेटिंग एप्स आलीयत.”

दुनियादारी सिनेमामुळे सई-स्वप्निल मॅनिया निर्माण झाला. जो आजही फिल्मइंडस्ट्रीत आहे. तसाच सध्या ‘लकी कपल’ची ही खूप फॅनफॉलोविंग आहे. सध्या अभय-दिप्तीचे चार-सहा फॅनक्लब सोशल मीडियावर कार्यरत आहेत. अभय महाजन ह्याविषयी म्हणतो, “आजपर्यत मी अनेक बॉलीवूड आणि मराठी स्टार्सचा फॅन होतो. पण आता चक्क माझे आणि दिप्तीचे चार-पाच फॅनक्लब आहेत. ही गोष्टच खूप भारावणारी आहे. मी दादांचा ऋणी आहे, की त्यांनी जे लार्जर दॅन लाइफ स्वप्न बनवलं त्याचा मी हिस्सा होऊ शकलो. आणि त्यामूळे आज आमच्यावर एवढं भरभरून प्रेम करणारी माणसं आम्हांला मिळाली."

 'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकला आहे.


Web Title: sanjay jadhav lucky movie release on 7th february
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.