ठळक मुद्देपूर्वा आता मराठी सिनेमांकडे वळली असून 'भयभीत' या आगामी मराठी सिनेमात ती एक महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

काही कलाकारांना थेट मोठ्या पडद्यावर एंट्री करण्याची संधी मिळते, तर काही छोट्या पडद्याच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचतात. पूर्वा गोखले हे नाव छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी नवं नाही. या मराठमोळ्या अभिनेत्रीने मराठी रसिकांसोबतच हिंदी प्रेक्षकांवरही आपल्या अभिनयाची मोहिनी घातली आहे. हीच पूर्वा आता मराठी सिनेमांकडे वळली असून 'भयभीत' या आगामी मराठी सिनेमात ती एक महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 'अ‍ॅक्च्युअल मुव्हीज प्रोडक्शन्स‘ ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ प्रस्तुती असलेल्या 'भयभीत' या आगामी मराठी सिनेमाचं दिग्दर्शन दीपक नायडूने केले आहे. २८ फेब्रुवारीला हा  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पूर्वा गोखले हे नाव उच्चारताच 'कुलवधू' या गाजलेल्या मराठी मालिकेतील सुबोध भावेसोबत मुख्य भूमिकेत दिसलेली नायिका आठवते. तसेच पूर्वाने 'कहानी घर घर की', 'कोई दिल में है' या हिंदी मालिकांद्वारे रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या तिची 'तुझसे है राबता' ही हिंदी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सिनेविश्वातील पदार्पणाच्या वाटेवर पूर्वाला आपला जुना सहकारी पुन्हा भेटला आहे. 'कुलवधू' या मालिकेतील नायक सुबोध भावे आगामी 'भयभीत' या सिनेमातही पूर्वा सोबत काम करत आहे. रहस्यमय घटना आणि मानवी नातेसंबंध याद्वारे कथानकात निर्माण करण्यात आलेली गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. 'भयभीत' या सिनेमाचे कथानक भावल्यानेच इतकी वर्षे मालिकांमध्ये रमल्यानंतर सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचं पूर्वाचं म्हणणं आहे. यासोबतच दीपक नायडू यांची अनोखी दिग्दर्शनशैली 'भयभीत'च्या विषयाला अचूक न्याय देण्यासाठी पूरक ठरल्याचं पूर्वा मानते.

'भयभीत' या सिनेमाच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील रसिकांची ही आवडती जोडी त्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यांच्या जोडीला मधू शर्मा, गिरीजा जोशी, मृणाल जाधव आणि यतीन कार्येकर हे कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. नकाश अझीझ यांनी या सिनेमाला संगीत-पार्श्वसंगीत दिलं आहे. निर्मिती शंकर रोहरा, दिपक नारायणी यांची असून अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

Web Title: Poorva Gokhale will do her movie debut with marathi movie bhaybheet with subodh bhave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.