Marathi Cinema superhit on Box Office | बॉक्स ऑफिसवर मराठी पाऊल पडते पुढे
बॉक्स ऑफिसवर मराठी पाऊल पडते पुढे


मराठी चित्रपटांनी फक्त देशातच नाही तर सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. मराठी चित्रपटांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून चित्रपटाच्या निर्मिती संख्येत वाढ होताना दिसते आहे. वर्षाकाठी शंभराहून अधिक चित्रपट थिएटरमध्ये झळकू लागले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील निरनिराळ्या प्रयोगांमुळे मराठी चित्रपटांकडे केवळ मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकही वळायला लागले आहेत. बॉलिवूडला देखील मराठी चित्रपटांनी चांगलीच भुरळ पाडली आहे. एवढंच काय तर मराठी चित्रपट आता हिंदी चित्रपटाच्या वरचढ ठरत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला अभिनेता सुबोध भावेचा चित्रपट '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आमीर खान व अमिताभ बच्चन या दिग्गज कलाकारांच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाच्या शर्यतीत उतरून बाजी मारली आहे. दर्जेदार संवाद व दमदार अभिनयाचे सजलेल्या काशिनाथ घाणेकर यांची जादू बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळते आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत व बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा बहुचर्चित व प्रतिक्षीत चित्रपट '2.0' याच दरम्यान प्रदर्शित झाला. तरी देखील 'नाळ', 'मुळशी पॅटर्न' व 'माधुरी' या मराठी चित्रपटांनी आपली यशस्वी घौडदौड बॉक्स ऑफिसवर कायम ठेवल्याची पाहायला मिळते आहे. खरेच ही कौतुकास्पद बाब आहे. याबाबत काही सिनेतज्ज्ञांची मत आम्ही जाणून घेतली आहेत. 
 

मराठी चित्रपटांचा आशय खूप चांगला असतो. त्यामुळे मराठी सिनेमांना रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. मराठी चित्रपटांनी नेहमीच सिद्ध केले आहे की त्यांचा आशयच चित्रपटाचा खरा हिरो असतो. त्यामुळे सध्या आपल्याला बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमे हिंदी चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहेत. 
- तरण आदर्श, चित्रपट व्यापार विश्लेषक

बॉक्स ऑफिसवर 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर', 'मुळशी पॅटर्न' व 'माधुरी' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरून आहेत. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. रजनीकांत व अक्षय कुमारचा '2.0' नुकताच प्रदर्शित झाला. तरी या चित्रपटामुळे मराठी सिनेमांवर बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही.  मराठी चित्रपटाचे मार्केट वाढले असल्याचे चित्र यातून स्पष्ट होते. त्यामुळे मी खूप खूश आहे. मोठा हिंदी सिनेमा टक्कर देत असताना देखील मराठी चित्रपट थिएटरगृहात तग धरून आहे, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप मोठी बाब आहे. भविष्यात हिंदी निर्माते मराठी चित्रपटांसोबत सिनेमा प्रदर्शित करताना दहा वेळा विचार करतील.
- मोहसीन अख्तर मीर, निर्माता 

मराठी सिनेसृष्टीसोबतच निर्माते, दिग्दर्शक, कलाकार व प्रेक्षकांसाठी ही खूप चांगली बाब आहे. सध्या मराठीत विविध विषय हाताळले जात आहेत. चांगले आशय असणारे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. तसेच चांगले थिएटर शोज आपल्याला मिळत आहेत. फक्त महाराष्ट्रात नाही तर परदेशातही मराठी चित्रपट रिलीज होत आहेत. अमराठी गुंतवणूकदार मराठी सिनेमांकडे वळत आहेत. त्यामुळे खूप छान दिवस मराठी चित्रपटसृष्टीला आले आहेत.
- मुक्ता बर्वे, अभिनेत्री

सध्या खूप चांगल्या आशयांचे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', 'मुळशी पॅटर्न', 'नाळ' आणि 'माधुरी' हे सध्या बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. मात्र त्यांच्या सशक्त आशयामुळे रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मराठी चित्रपटसृष्टी एकनिष्ठ (monotonous) अजिबात राहिलेली नाही. चांगले विषय व विचार रुपेरी पडद्यावर मांडले जात आहेत. त्यामुळे प्रेक्षकदेखील सुजाण झाला आहे. सातासमुद्रापार मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. सध्या हिंदी चित्रपटांच्या तोडीस तोड मराठी चित्रपट बनत आहेत. 
- देवदत्त नागे, अभिनेता -निर्माता

आपला प्रेक्षक इतका हुशार व प्रगल्भ आहे. सशक्त व दर्जेदार विषय आपण जर मांडले तर प्रेक्षक चांगल्याची निवड करेल, अशी मला खात्री आहे. हिंदी चित्रपटांना टक्कर द्यायला सुरूवात 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाने केली आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपटात आमीर खान व अमिताभ बच्चन यांच्यासारखे मातब्बर कलाकार असताना मराठी चित्रपट तग धरून राहील असा कुणी विचारदेखील केला नव्हता. तरीदेखील आम्हाला कुठेतरी खात्री होती की आपला चित्रपट खूपच सशक्त आहे. त्यात जबरदस्त कलाकारांची फळी होती. काशिनाथ घाणेकर सारख्या नटश्रेष्ठाच्या जीवनावर आधारीत चित्रपट त्यात श्रीराम लागू व सुलोचना दीदी. त्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहायला नक्कीच गर्दी करणार. हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आपला चित्रपट प्रदर्शित करू असा विचार केला तर आपण मागेच राहू. जर मराठी सिनेमा मोठा करायचा असेल तर ही रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल. मराठी सिनेमाने बॉलिवूडला टक्कर देत पुढे जायला पाहिजे. एक दिवस असा आला पाहिजे की मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे तर आपण हिंदी चित्रपट प्रदर्शित नको करूयात, असा विचार हिंदी निर्मात्यांना पडला पाहिजे. ही ताकद आपल्याला उत्तरोत्तर वाढवायला पाहिजे. मराठीतील चांगला सिनेमा प्रदर्शित झाला आहे आणि तो हिंदी चित्रपटासमोर तग धरून आहेत अशी बरीच उदाहरणे आहेत. एकीकडे चांगले चित्रपट देखील केले पाहिजेत आणि हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेबाबत आग्रही असले पाहिजे. आज गेल्या दीड महिन्यातील जे चित्र आहे त्यातून आपण हिंदी सिनेमांना टक्कर देऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे. 
- निखिल साने, व्यवसाय प्रमुख, मराठी मनोरंजन विभाग, व्हायाकॉम १८

Web Title: Marathi Cinema superhit on Box Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.