Vijay Chavan Last Interview: विजय चव्हाणांनी ‘लोकमत’ला दिलेली ‘ही’ मुलाखत ठरली अखेरची!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 08:43 AM2018-08-24T08:43:58+5:302018-08-24T08:45:14+5:30

Vijay Chavan Last Interview: गेल्या काही महिन्यांपूर्वी विजय चव्हाण यांच्या प्रकृतीशी निगडित अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लोकमतला खास मुलाखत दिली होती. हीच मुलाखत लोकमतच्या वाचकांसाठी पुन्हा एकदा....

i will be back soon vijay chavan, vijay chavan last interview | Vijay Chavan Last Interview: विजय चव्हाणांनी ‘लोकमत’ला दिलेली ‘ही’ मुलाखत ठरली अखेरची!

Vijay Chavan Last Interview: विजय चव्हाणांनी ‘लोकमत’ला दिलेली ‘ही’ मुलाखत ठरली अखेरची!

googlenewsNext

गेल्या काही महिन्यांपूर्वी विजय चव्हाण यांच्या प्रकृतीशी निगडित अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लोकमतला खास मुलाखत दिली होती. हीच मुलाखत लोकमतच्या वाचकांसाठी पुन्हा एकदा....

मी लवकरच परतेन - विजय चव्हाण


अभिनेते विजय चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होते. पण आता ते आजारपणातून पूर्णपणे बरे झाले असून उठायला-बसायलाही लागले आहेत. पण तरीही आजही काही सोशल नेटवर्किंग साईटसवर त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे संदेश फिरत आहेत. याबाबत विजय चव्हाण यांनी मी पूर्णपणे बरा असून लवकरात लवकर चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे असा संदेश त्यांच्या चाहत्यांना दिला आहे. विजय चव्हाण यांनी याबाबत लोकमतची प्रतिनिधी प्राजक्ता चिटणीससोबत मारलेल्या खास गप्पा...

तुमच्या तब्येतीच्या बाबतीत खूप साऱ्या अफवा आहेत. याबाबत तुम्ही काय सांगाल?
माझी तब्येत पूर्णपणे ढासळली आहे. मी अंथरुणावरून हलूही शकत नाही अशाप्रकारचे संदेश आणि फोटो सोशल मीडियावरून सध्या फिरत आहेत. या सगळ्या  गोष्टी पूर्णपणे चुकीच्या असल्याचे मला माझ्या चाहत्यांना सांगायचे आहे. माझी तब्येत बिघडली होती हे खरे असले तरी मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. 

तुमच्या तब्येतीला नेमके काय झाले होते?
मी काही महिन्यांपासून सतत चित्रपटांचे चित्रीकरण करत होतो. मी आजारी पडायच्या आधी कोल्हापूरला जवळजवळ १५ दिवस ‘काव काव कावळे’ आणि ‘अतिथी देवो भव’ या दोन चित्रपटांचे चित्रीकरण करत होतो. या चित्रपटांच्या चित्रीकरणाच्यावेळीच माझे पाय प्रचंड सुजायला लागले होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मला पायात चप्पलही घालता येत नव्हती. पण मी मुंबईला परतलो असतो तर निर्मात्यांचे प्रचंड नुकसान झाले असते. त्यामुळे त्या अवस्थेतही मी चित्रीकरण करतच राहिलो. माझ्या तब्येतीच्या बाबतीत घरातल्यांनाही काही कळवले नाही. दरम्यान युनिटमधील लोकांनी तेथील एका डॉक्टरलाही बोलावले होते. पण त्यांनी दिलेल्या औषधाचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. उलट सूज दिवसेंदिवस वाढतच होती. चित्रीकरण संपल्यावर मुंबईत आल्यावर थेट मी मुलुंडमधील धन्वंतरी या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यावेळी माझे वजनही चांगलेच वाढले होते. माझ्या पायाची सूज पाहून डॉक्टर माझ्यावर प्रचंड चिडले. त्यांनी मला लगेचच अ‍ॅडमिट करून घेतले. माझ्या पायात खूप पाणी झाल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यावर मला दुष्काळी भागात ठेवा, लोकांची पाण्याची सोय होईल असे म्हणून मी डॉक्टरांची टरही खेचली होती. माझी फुफ्फुसं कमकुवत असल्याने पाय सूजत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार सुरू करूनही माझी तब्येत अधिकच बिघडत होती. त्यामुळे मला मुलुंडमधीलच फोर्टिसमध्ये शिफ्ट करण्यात आले. तिथे जवळजवळ मी एक महिना आयसीयुत होतो. मृत्यूच्या दाढेतून मी परत आलो आहे असेच मी म्हणेन.

तुम्हाला हा त्रास पूर्वीपासूनच होत होता का?
पाय सूजण्याचा त्रास २०१२ पासूनच सुरू झाला होता. मी त्यावेळी ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. मुंबईचे चित्रीकरण झाल्यानंतर आम्हाला कोल्हापूरला जायचे होते. पण माझे पाय खूपच सुजत असल्याने मी डॉक्टरांना दाखवले. त्यावेळीच माझी फुफ्फुसं कमकूवत झाली असल्याचे मला डॉक्टरांनी सांगितले होते. पुढील आयुष्यात मला रोज दिवसातील काही तास तरी आॅक्सिजन सिलेंडरची गरज लागणार असे त्यांनी सांगितले होते. कोल्हापूरला ‘श्रीमंत दामोदरपंत’चे चित्रीकरण सुरू होऊन पाच दिवस झाले होते. पण तरीही मी मुंबईत अ‍ॅडमिटच होतो. शेवटी मी अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन कोल्हापूरला गेलो होतो. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी ‘माझी वॅनिटी तुझ्यापेक्षा किती सुसज्ज आहे हे बघ,’ अशी मी भरतची अनेकवेळा मस्करी करायचो. मी कोल्हापूरला माझ्यासोबत आॅक्सिजन सिलेंडरही घेऊन गेलो होतो. मी ते सिलेंडर सेटवरच ठेवायचो. चित्रीकरणाच्यावेळी एक दृश्य झाले की, मी लगेचच आॅक्सिजन लावत असे. त्यानंतर काही दिवसांनी माझी तब्येत काहीशी सुधारली. पण तरीही रोज रात्री आॅक्सिजन थोडा वेळ तरी मला लावावा लागत असे. त्यामुळे तेव्हापासून मी कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणाला जाताना सिलेंडर माझ्या सोबत घेऊन जात असे. या दरम्यानच्या काळातही मी घरी बसून राहिलो नाही. मी या तीन-चार वर्षांच्या काळात ‘हलाल’, ‘काव काव कावळे’, ‘अतिथी देवो भव’, ‘हुंताश’, ‘सांगतो ऐका’, ‘ए ढिश्शूम’ यांसारख्या चित्रपटांचे चित्रीकरण केले.

तुमच्या आजारपणात मराठी फिल्म इंडस्ट्री तुमच्या पाठिशी उभी राहिली का?
मी आजारी आहे हे कळल्यावर अक्षरश: इंडस्ट्रीतील लोकांची रिघ हॉस्पिटलमध्ये लागलेली होती. मी आयसीयुत असल्याने मला भेटायची कोणालाच परवानगी नव्हती. पण सगळे माझ्या कुटुंबियांना येऊन भेटत होते. दिवसभरात तर लोक यायचे. पण काहीजण रात्री चित्रीकरण संपल्यावर दीड-दोनला हॉस्पिटलला येऊन जायचे. मी ज्यांच्यासोबत काम केले, ते सगळे तर आले. पण काही जणांसोबत तर मी कधी काम केले नाही असेही लोक मला आवर्जून भेटायला आले. मला भेटायला येणाºयांची संख्या इतकी होती की, इतरांना त्रास होऊ नये म्हणून फोर्टिस हॉस्पिटलने मला भेटायला येणाºया लोकांसाठी एक वेगळी खोलीच दिली होती.

आता तुमची तब्येत कशी आहे आणि तुम्ही पुन्हा चित्रीकरणाला कधी सुुरुवात करणार आहात?
मी आता व्यवस्थित उठायला-बसायला लागलो आहे. आता मला जेवणही जात आहे. त्यामुळे काहीच महिन्यात माझी तब्येत पूर्णपणे बरी होईल अशी मला खात्री आहे. तब्येत बरी झाल्यावर लगेचच मी चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. लवकरात लवकर तितक्याच जोमाने मी पुन्हा काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 
 

Web Title: i will be back soon vijay chavan, vijay chavan last interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.