'Dokyala shot' Releasing Soon | 'डोक्याला शॉट' लावणारी मैत्री अवतरणार रूपेरी पडद्यावर
'डोक्याला शॉट' लावणारी मैत्री अवतरणार रूपेरी पडद्यावर

सगळ्या नात्यांपेक्षा मैत्रीचे नाते हे नेहमीच अनोखे असते. त्या नात्याला ना काही मर्यादा असतात ना काही मापदंड. 'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन' निर्मित 'डोक्याला शॉट' या चित्रपटात प्रेक्षकांना मैत्रीचे असेच आगळेवेगळे नाते पाहायला मिळणार आहे. अभिजीत (सुव्रत जोशी), भज्जी (रोहित हळदीकर), चंदू (ओंकार गोवर्धन) आणि गणेश (गणेश पंडित) या चार मित्रांभोवती ही कथा फिरते.  वेगवेगळ्या स्वभावाचे हे चौघेही स्वतःला खूप हुशार आणि डोकेबाज समजतात, जे प्रत्यक्षात नाहीत. त्यांच्या बाबतीत नेहमीच काहीनाकाही अंतरंग घडतच असते. 'डोक्याला शॉट'च्या टायटल ट्रॅकवरून आतापर्यंत प्रेक्षकांना हा अंदाज आला असेलच. या चार कमाल मित्रांपैकी अभिजीत हा प्रेमात पडतो, ते सुद्धा तामिळ मुलीच्या. अनेक दिव्य पार पडत अखेर त्यांचे लग्न होणार असतेच, तोच अभिजीतच्या आयुष्यात असा प्रसंग घडतो, जो सगळ्यांसाठीच पुढे ठरतो 'डोक्याला शॉट'. 

आपल्या मित्राच्या आयुष्यात अनपेक्षितपणे ओढवलेल्या या प्रसंगादरम्यान हे मित्र त्याला कशी साथ देतात आणि यादरम्यान उडणारी त्यांची तारांबळ प्रेक्षकांना निश्चितच खिळवून ठेवणारी आहे.अनेकदा आपले मित्र आपली खिल्ली उडवतात, थट्टामस्करी करतात, तरीही अडीअडचणीच्या काळात मदतीचा पहिला हात त्यांचाच असतो. या चित्रपटातही प्रेक्षकांना असेच काहीसे पाहायला मिळणार आहे. खरे तर एका गंभीर प्रसंगातून मित्राला बाहेर काढताना जो, तो आपापल्या परीने प्रयत्न करतो, आणि त्यातूनच अनेक विनोद आपसूकच घडत जातात. जे प्रेक्षकांना निश्चितच खदखदून हसवतील. याव्यतिरिक्त या चार मित्रांमध्ये प्रेक्षक नक्कीच कुठेतरी आपल्या मित्राला अथवा स्वतःला शोधतील हे नक्की.

शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित या चित्रपटात प्राजक्ता माळी हिची सुद्धा प्रमुख भूमिका आहे. प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन करणारा हा चित्रपट १ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 


Web Title: 'Dokyala shot' Releasing Soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.