ठळक मुद्देएका तासात भेटून परत यायचे असेच ठरवून मयुरी आशुतोषला भेटायला गेली. मात्र पहिल्याच भेटीत दोघांनीही तब्बल पाच तास गप्पा मारल्या.

‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमधील राहत्या घरात आत्महत्या केली आणि सगळ्यांचा धक्का बसला.  आशुतोष गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि  डिप्रेशनमुळेच त्याने   हे टोकाचे पाऊल का उचलल्याचे मानले जात आहे.  
आशुतोष व मयुरी यांनी 20 जानेवारी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती.  मयुरी व आशुतोषचे म्हणायला एक अरेंज मॅरेज आणि मानायची तर एक लव्हस्टोरी होती. तर या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती एका पार्टीत.

तर मयुरीचे पप्पा  निवृत्त झाले. त्यावेळी त्यांनी एक पार्टी दिली. मयुरीच्या मानलेल्या भावांना त्यावेळी एक मुलगा खूप आवडला होता आणि तो मयुरीसाठी योग्य असल्याचे जाणवल्याने त्यांनी तिच्या न कळत त्यालाही पार्टीला बोलावले होते. तो, त्याचे वडील, मामा पार्टीला आले होते. कोणीतरी आपल्याला बघायला येतेय, याची मयुरीला काहीच कल्पना नव्हती. ती नेहमीप्रमाणेच तिच्याच विचारात होती. या पार्टीत तिने त्याला अगदी ओझरते  पाहिले आणि सहज हाय, हॅलो केले. पुढे तर   ही भेट ती विसरूनही गेली होती. असा एक मुलगा कोणी पार्टीला आला होता, हे तिच्या लक्षातही नव्हते. मग दोन दिवसांनी घराच्यांनी तिला विचारलेच.  पार्टीला आलेला तो मुलगा तुला कसा वाटला, असा थेट प्रश्नच त्यांनी तिला केला. मयुरीसाठी हा धक्काच होता.

 कुठला मुलगा? असा यावर तिचा प्रश्न होता. मग घरच्यांनी तिला त्याची सगळी माहिती सांगितली. पण मयुरीने लग्नाला थेट नकार दिला होता. कारण त्यावेळी ती लग्नाच्या   मन:स्थितीत नव्हतीच. मात्र घरच्यांनी मुलाकडच्यांना तिचा नकार कळवलाच नाही. आशुतोष तर पहिल्या भेटीतच मयुरीच्या प्रेमात पडला होता. तिने काहीतरी उत्तर द्यावे होकार किंवा नकार कळवावा, असेच त्याला वाटत होते. पण मयुरीकडून काहीच प्रतिसाद नव्हता.

त्यानंतर पुन्हा एकदा योग आला. निदान एकदा तरी त्या मुलाला भेट नंतर वाटले तर तू त्याला नकार दे,असे घरच्यांनी तिला सांगितला. ती सुद्धा तयार झाली.  एका तासात भेटून परत यायचे असेच ठरवून मयुरी आशुतोषला भेटायला गेली. मात्र पहिल्याच भेटीत दोघांनीही तब्बल पाच तास गप्पा मारल्या. पहिल्याच भेटीत आशुतोषने लग्नाच्या निर्णयाचा बॉल मयुरीच्या कोर्टात टाकला. आपल्याला काहीच घाई नाहीये. तुला पाचव्या भेटीत सांगण्यापेक्षा मी पहिल्याच भेटीत सांगतो की, तू मला फार आवडली आहेस. मला तुझ्याशी लग्न करायचेय, असे तो म्हणाला. पुढे मयुरीनेही आशुतोषला लग्नासाठी होकार कळवला आणि  पहिल्या  भेटीच्या सात-आठ महिन्यांनंतर दोघांनीही लग्न केले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ashutosh Bhakre suicide; khulta kali khulena fame mayuri deshmukh and Ashutosh Bhakre love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.